BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : साईबाबांच्या प्रति शिर्डी शिरगावमध्ये बस स्टॉपवर सापडले स्त्री जातीचे अर्भक

एमपीसी न्यूज – प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावमध्ये एका बस स्टॉपवर स्त्री जातीचे अर्भक सापडले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आला.

संतोष छगन गोपाळे (वय 31, रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शिरगावात मारुती मंदिराजवळ राहतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर आमदार बाळा भेगडे निवारा शेड बस स्टॉप आहे. रविवारी रात्री मावळ भागात जोरदार पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या दरम्यान पावसाने थोडी उघडीप दिली. त्यामुळे जेवण झाल्यानंतर संतोष शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. ते घरापासून चालत काही अंतर पुढे आले. आमदार बाळा भेगडे निवारा शेड बस स्टॉपजवळ आले असता त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता कोणीही दिसले नाही. बस स्टॉपमध्ये जाऊन बघितले असता बस स्टॉपमध्ये फरशीवर पाणी साचलेले होते. त्या पाण्यात एका पातळ कापडात गुंडाळलेले एक स्त्री जातीचे 25 ते 30 दिवसांचे बाळ दिसले.

संतोष यांनी तात्काळ शिरगावचे पोलीस पाटील आणि उपसरपंच यांना याबाबत माहिती दिली. बाळ पाण्यात असल्याने ते थंडीने काकडून गेले. संतोष यांना एक लहान मुलगी आहे. त्यांनी पटकन घरात जाऊन आपल्या मुलीचे गरम कपडे आणून सापडलेल्या बाळाला घातले. उपसरपंचांनी दूध आणून बाळाला पाजले. त्यानंतर सर्वांनी मिळून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. बाळाची वैद्यकीय तपासणी पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आली. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांची प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणा-या शिरगाव येथे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाळाची प्रकृती सध्या चांगली असून तळेगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

.