Talegaon Dabhade : वैयक्तिक भांडणाला राजकीय रंग देऊ नये – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – रस्त्यावर साठलेले पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी केले आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या सुनील शेळके यांचे कट्टर समर्थक असलेल्या कल्पेश मराठे यांना काल वराळे येथे बेदम मारहाण झाली. मारहाण करणाऱ्यांमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले आहे. शेळके ़यांनी या प्रकरणी थेट राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्याबाबत विचारले असता भेगडे म्हणाले की, वारळे येथे घडलेली घटना ही वाईट व दुःखदायक आहे. कल्पेश मराठे हा आपलाही नातेवाईक आहे. रस्त्याने मोटारीतून जाताना पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून भांडणाला सुरूवात झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्यातून मारामारी झाली. त्यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील.

विनाकारण वैयक्तिक भांडणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन बाळा भेगडे यांनी केले आहे. मावळ हा शांतताप्रिय तालुका असून सर्वांनीच संयमाने वागून शांतता अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.