Talegaon Dabhade : श्री शिवशंभू तीर्थ निर्मितीकरिता नोव्हेम्बर महिन्यात जाणता राजा महानाट्याचे प्रयोग

एमपीसी न्यूज- छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती व स्व गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथे श्री शिवशंभू तीर्थ निर्मितीकरिता निधी उभारणीसाठी 10 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कृत “ जाणता राजा ” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक संतोष भेगडे पाटील व सुनील शेळके यांनी जाहीर केले. या महानाट्याचे स्वागताध्यक्ष म्हणून समितीचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य व मावळचे आमदार संजय तथा बाळा भेगडे असतील.

जाणता राजा महानाट्य 2018 या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय तथा बाळा भेगडे यांच्या हस्ते आज झाले. तळेगाव दाभाडे शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे एकत्रित पूर्णाकृती शिल्प लोकवर्गणी व जाणता राजा प्रयोगाच्या आयोजनातुन निधी संकलनाद्वारे साकारणार आहे. १२ फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुर्णाकृती ब्रांझ धातुतील शिल्प तयार करण्याचे काम सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांच्या स्टुडिओत सुरु आहे.

2009 साली या स्मारकाचे भूमिपूजन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले होते. स्मारकाच्या आराखडयात शिल्पाबरोबर शिवछत्रपती व संभाजी महाराजांचा शिल्पमय इतिहास दर्शविणारे संग्रहालय देखील निर्माण केले जाणार आहे.

“जाणता राजा” महानाट्य नियोजन समितीमध्ये सक्रीय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधी, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, शिवप्रेमी यांनी कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे – पाटील यांनी केले आहे. जाणता राजा या महानाट्याचा पहिला प्रयोग 1985 साली झाला व आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त प्रयोग संपूर्ण देशभरात तसेच अमेरिका व लंडनमध्येही झाले आहेत. सुमारे 300 कलाकारासह फिरता रंगमंच, तसेच हत्ती, घोड़े, बैलगाड़ी हे या महानाट्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे. शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमातून घडलेला महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास असा तीन तासांचा प्रयोग असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.