Talegaon Dabhade : लोकहितासाठी पत्रकारांचा अंकुश महत्त्वाचा- नगराध्यक्षा चित्रा जगनाडे

पत्रकारिता दिनानिमित्त सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज- शासन, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि प्रशासन यांच्यातील त्रुटीवर अंकुश ठेवण्याचे पत्रकारांचे काम लोकहितासाठी महत्त्वाचे आहे. सत्याची पारख करून ते निःपक्षपातीपणे मांडण्याचा प्रयत्न तळेेगावतील पत्रकार करत आहेत. नगरपरिषदेतर्फे त्यांचा सन्मान करणे आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी सोमवारी (ता.७) तळेगाव येथे केले.

मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सभागृह गट नेते सुशील सैंदाणे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे आणि मुख्याधिकारी वैभव आवारे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

तळेगाव दाभाडे आणि परिसरातील संपादक, सहसंपादक, बातमीदार, वार्ताहर आणि प्रेस छायाचित्रकार यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मावळ तालुका स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अमीन खान, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. गोपाळे, तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे सचिव महादेव वाघमारे, विलास भेगडे, रमेश जाधव, मनोहर दाभाडे, सुनील वाळुंज, प्रभाकर तुमकर, गणेश बोरुडे, मंगेश फल्ले, संदीप भेगडे, संतोष थिटे, अतुल पवार, महेश भागीवंत, जगन्नाथ काळे, अंकुश दाभाडे यांचा सन्मान करण्यात आला. उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका आणि गटनेत्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित नगरसेवक, नगरसेविका आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

अमीन खान म्हणाले, ” समाजातील दुष्टप्रवृत्तीवर आपल्या शब्द अभंगाने घणाघाती सत्य मांडणारे संत तुकोबाराय हेच खरे तर मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आणि पितामह आहेत. त्यांच्या आचारविचारात पत्रकारितेचे मूळ असून आव्हानांना लीलया पेलण्यासाठी संत तुकोबाराय हीच खरी शक्ती व प्रेरणा आहे”

सुशील सैंदाणे म्हणाले, ” शब्द हेचि धन…हे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले. शब्द श्रीमंती जपत पत्रकारांनी तत्व आणि निष्ठेने पत्रकारिता केली तर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर मोठा अंकुश राहतो. तो ठेवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला पाहिजे”

गोपाळे गुरुजी म्हणाले,” आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी 200 वर्षांपूर्वी इंग्रजांच्या भक्कम सरकारी एकछत्री अंमलाखाली देश असताना त्याविरुद्ध दर्पणच्या माध्यमातून घणाघाती प्रबोधन केले. पारंपरिक कुप्रथा आणि सामाजिक दबावाला झुगारून त्यांनी सामाजिक सुधारणावादी कार्य लेखणीच्या माध्यमातून निर्भिडपणे केले”

सुलोचना आवारे म्हणाल्या, “आपल्या विरुद्ध लिहिले तरी पत्रकारांचा सन्मान केलाच पाहिजे. त्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पत्रकार जर 15 दिवस संपावर गेले तर सारी व्यवस्था कोलमडून पडेल. पत्रकार हा खूप धाडसी आणि निर्भीड असतो. नगरपरिषदेने त्यांचा सन्मान केला ही खूप चांगली बाब आहे”

यावेळी नगरसेवक अरूण भेगडे, अमोल शेटे, रोहित लांघे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, संध्या भेगडे, मंगल भेगडे, वैशाली दाभाडे, मंगल जाधव, विभावरी दाभाडे, अनिता पवार, मुख्याधिकारी वैभव आवारे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like