Talegaon Dabhade : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कैलास गायकवाड यांची निवड

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मावळ (ग्रामीण) तालुकाध्यक्ष पदी कांब्रे (नाणे मावळ) येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष कैलास बबन गायकवाड यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीने तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रमेश गायकवाड यांनी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्याबाबत धनकवडी (पुणे) येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदींच्या उपस्थितीत बैठक घेऊन अखेर कैलास गायकवाड यांची मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (ग्रामीण) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

कैलास गायकवाड यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदही भूषविले आहे. गायकवाड यांचा मावळ तालुक्यातील युवक व विद्यार्थी वर्गाशी दांडगा संपर्क आहे. गायकवाड यांच्या निवडीने युवक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन नवचैतन्य संचारले आहे. यावेळी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कांब्रे (नाणे मावळ) ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. गायकवाड हे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असून त्यांच्याकडे युवक वर्गाचे मजबूत संघटन आहे.

कैलास गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, सत्कारप्रसंगी गायकवाड म्हणाले,” पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी निवड केली” आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धरतीवर गाव तेथे युवक शाखा स्थापन करून युवकांचे मजबूत संघटन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.