Talegaon Dabhade : आज दान ‘देण्या’पलीकडे डोकावण्याची गरज : डॉ. गिरीश कुलकर्णी

कांतीलाल शाह विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज- आज समाजात दान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात हात पुढे येत आहेत. दान देणे म्हणजेच समाजसेवा समजली जाते. पण पालकांनी आपल्या पाल्याला समाजातील अन्याय, अत्याचार या विरोधात संघर्ष करायलाही शिकविण्याची आवश्यकता आहे. संघर्षाची भावना आपल्या पालकत्वातून मुलांपुढे आली पाहिजे, असे प्रतिपादन स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील कांतीलाल शाह विद्यालयात ‘सपनों का भारत’ या थिमवर आधारीत स्नेहसंमेलन व पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश कुलकर्णी होते. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे कार्यवाह रामदास काकडे, शाळेचे अध्यक्ष शैलेश शाह, संजय साने, महेश शाह, नम्रता शाह, प्राची शाह, डॉ. लीना कश्यप, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राजश्री शाह, डॉ. किरण देशमुख, शर्मिला शाह, यशवंत पाटील, डॉ. शाळीग्राम भंडारी, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मुख्याध्यापिका सुमन रावत, उपमुख्याध्यापिका वैशाली शिंदे, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख स्मिता पेंडुरकर आदी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमात वानप्रस्थाश्रम वृद्धाश्रमच्या उर्मिला छाजेड, जय वकील शाळेच्या नयना डोळस आणि किनारा वृद्धाश्रमच्या प्रीती वैद्य यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, की आज सामाजिक जाणीव म्हणजे फक्त देणगी द्यायची आणि कर्तव्य बजावले अशी स्वत:ची समजूत घालायची, ही भावना समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे नुसते देण्यापेक्षा सर्वोत्तम देण्याचा दृष्टीकोन पालकांनी पाल्यांमध्ये जागृृत केल्यास समाजातील उपेक्षित थराला आपण बदलवू शकतो. प्रत्यक्ष कृती आणि प्रतिकार करायला शिकल्यास सक्षम भारत निर्माण होईल. घटनेतील अधिकारांबरोबरच मुलभूत कर्तव्य देखील वाचून प्रत्येकाने त्यांचे प्रत्यक्ष आचरण करायला हवे. येणारा काळ कठीण काळ आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे. पाल्यांना सामाजिक जाणीव करून देण्याची गरज आहे. त्यानंतरच भविष्यातला भारत मुलांसाठी आणि समाजातल्या दुबळ्या लोकांसाठी खर्‍या अर्थाने सुरक्षित देश असणार आहे, असेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रुण हत्या, बालकामगार, महिला अत्याचार, पर्यावरण आदी विषयांवर प्रबोधनात्मक वेशभूषा करत नृत्य आणि गीते सादर केली. भ्रष्टाचार, महिलांची समाजात होत असलेली कुचंबणा, अवमानाची वागणूक थांविण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी केले. ‘महिलांची समाजातील शक्ती’ यावर आधारीत सादरीकरणाने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. पॉवर ऑफ लाईट’चे सादरीकरणानेही उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

विद्यार्थी प्रतिनिधी देव तयडे आणि रश्मी मुरुगकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डिंपल शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिल्पा पाचलग यांनी आभार मानले. स्मिता पेंडूरकर, अर्चना चव्हाण आणि शिक्षकवृंदाने नियोजनासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.