-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Dabhade : शासनाकडून मोबदला घेऊनही संपादित जमिनीची परस्पर विक्री ?

कारवाई न झाल्यास खरेदीदार महिलेचा उपोषणाचा इशारा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – एमआयडीसीच्या रस्त्यासाठी शासनाने मोबदला देऊन जागा संपादित केलेली असतानाही मूळ जागामालकाने त्याच जमिनीची परस्पर विक्री केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. दोन जणांच्या सातबारा उताऱ्यावर एकच चतुःसीमा आढळल्याने दोन जमीन खरेदीदारांची आपसात भांडणे झाली आणि त्यातून ही माहिती पुढे आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून भूसंपादन झाल्यानंतरही जमिनीवर एमआयडीसीचा ताबा नोंदविण्यास दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा खरेदीदार महिला पूजा भालेराव आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

पूजा भालेराव यांनी याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातील आंबी येथील गट क्रमांक 105 मधील 26 गुंठे क्षेत्र वंदना विनोद देसाई व सुरेश सीताराम अनुसे यांनी 24 नोव्हेंबर 2005 रोजी दत्तात्रय बबन घोजगे व अनिल बबन तावरे यांच्याकडून खरेदी केले. त्यांनंतर पूजा केतन भालेराव यांनी 17 सप्टेंबर 2009 रोजी वंदना विनोद देसाई व सुरेश सीताराम अनुसे यांच्याकडून हे क्षेत्र खरेदी केले. सध्या या जमिनीच्या सात बारा उता-यावर पूजा भालेराव यांच्या नावाची नोंद आहे. पण ही जागा दुसऱ्या खरेदीखताने आणखी काही व्यक्तींना विकली गेली असल्याचे दिसून येत आहे.

चिंध्या उर्फ चिंतामण नारायण घोजगे, विकास चिंतामण घोजगे, संदीप चिंतामण घोजगे, जयश्री नवनाथ कर्पे, कुशा उर्फ मनोहर नारायण घोजगे, अनिल मनोहर घोजगे, सुनील मनोहर घोजगे, छबूबाई नारायण घोजगे यांच्याकडून सुनीता दत्तात्रय कुडे यांनी हीच जमीन खरेदी केली. त्यावर 7 मे 2010 रोजी दोन वर्षे जुना सातबारा उतारा जोडून त्यावर पूजा भालेराव यांच्याच जमिनीच्या चतुःसीमा नोंदवल्याचे दिसून येत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

पूजा भालेराव यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागवली. त्यात समजले की, या जागेतून एमआयडीसीचा रस्ता जाणार आहे. त्यासाठी या जमिनीवर आरक्षण आले आहे. सुनीता कुडे यांचे दस्त करण्यापूर्वी मूळ जमीन मालक (शेतकरी) चिंध्या उर्फ चिंतामण घोजगे, कुशा उर्फ मनोहर घोजगे, छबूबाई घोजगे यांनी एमआयडीसीचा रस्ता जमिनीतून जाणार असल्याने त्याचा शासनाकडून आर्थिक मोबदला 4 फेब्रुवारी 2004 रोजी उपविभागीय कार्यालय पुणे येथून घेतला आहे. मोबदला घेऊन देखील चिंध्या उर्फ चिंतामण घोजगे, कुशा उर्फ मनोहर घोजगे, छबूबाई घोजगे आणि सुनीता कुडे यांनी जाणीवपूर्वक दोन वर्षे जुना सात-बाराचा उतारा जोडून 7 मे 2010 रोजी या जमिनीचा बनावट दस्त तयार करून घेतला आहे, असे भालेराव यांनी म्हटले आहे.

सुनीता कुडे यांनी 24 ऑक्टोबर 2010 मध्ये या जमिनीची शासकीय मोजणी आणली. त्या मोजणीला पूजा भालेराव यांनी हरकत घेतली. पूजा भालेराव यांची हरकत असल्याने भूमी अधीक्षकांनी 21 ऑगस्ट 2012 रोजी ही मोजणी रद्द करण्याचा निर्णय दिला. मोजणी नकाशाच्या आधारे सुनीता कुडे यांनी गट क्रमांक 105 मधील जमीन विजय लक्ष्मीनारायण पांडे यांना 10 ऑगस्ट 2011 रोजी, रत्नमाला दिलीप बालवडकर यांना 10 मार्च 2011 रोजी आणि शरद हरिश्चंद्र गडसिंग, ऋषिकेश हरिश्चंद्र गडसिंग, निर्मला नामदेवराव बच्चे आदींना 30 एप्रिल 2011 रोजी खरेदीखत करून दिली. मूळ मालकांनी शासनाकडून पैशांचा मोबदला घेऊन देखील खरेदीखत करून शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप भालेराव यांनी केला आहे.

फसवणूक प्रकरणानंतर पूजा भालेराव 27 मे 2019 रोजी त्यांच्या जमिनीची मोजणी करत होत्या. त्यावेळी रत्नमाला बालवडकर यांचा मुलगा आणि दत्तात्रय कुडे यांनी पूजा भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पूजा भालेराव यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

चिंध्या घोजगे, कुशा उर्फ मनोहर घोजगे, छबूबाई घोजगे यांच्या हिस्स्याचे क्षेत्र गट क्रमांक 105 मधून कमी करण्याबाबत तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून दिरंगाई झाली आहे. यामुळे बोगस दस्त नोंदवले गेले आहेत. त्यामुळे या प्रकारात तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची चौकशी करावी. तसेच सुनीता कुडे यांचे दस्त व फेरफार रद्द करावेत. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयालयासमोर पूजा भालेराव आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक उपोषण करणार आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.