Talegaon Dabhade : बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनीचा व्यवहार करणाऱ्या आरोपींना न्यायालयाचा दणका

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील जमीन खरेदी-विक्रीच्या बोगस व्यवहाराबाबत बनावट कागदपत्रे बनवणे, ती खरी असल्याचे भासविणे, फसवणूक करणे या आरोपाखाली असलेल्या आरोपींनी सकृतदर्शनी गुन्हा केल्याचे निदर्शनास येत असल्याचा निष्कर्ष प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. गायकवाड यांनी काढून दोघा आरोपींनी दोषमुक्त करण्यासाठी केलेले दोन स्वतंत्र अर्ज फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी तक्रारदार सुभाष खळदे आणि अॅड सुभाष देसाई यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

भगवान टोपनदास ललवानी( रा. पिंपरी) आणि मिलिंद भागवत पोखरकर(रा.तळेगाव दाभाडे) अशी या आरोपींची नावे आहेत. महाराष्ट्र शासन विरूध्द सात आरोपी असलेल्या या खटल्यावरील न्यायालयीन निर्णयामुळे अशा गुन्हेगारी प्रकरणांना न्याय मिळण्याच्या मार्गास अधिक बळकटी मिळाली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील जुना स.नं. 642/2 व नवीन स.नं. 394/2 या पाच हेक्टर 51.6 गुंठे क्षेत्राच्या जमिनीचा परस्पर व बेकायदेशीर खरेदीविक्री व्यवहार बोगस कागदपत्रांच्या आधारे सात इसमांनी केला असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज कायदेशीर वहिवाटदार गोविंद यशवंत खळदे, मुरलीधर यशवंत खळदे, सुभाष यशवंत खळदे आणि विलास यशवंत खळदे यांच्यातर्फे 7 जुलै, 2014 रोजी दाखल केला होता. त्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी तळेगाव पोलिसांनी तो तक्रार अर्ज हद्दीचे कारण दाखवत वडगाव मावळ पोलीस ठाण्याकडे ऑगस्ट 2015 मध्ये वर्ग केला.

त्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून सदर बोगस व्यवहारातील प्रेम चेलाराम तिलोकचंदानी, खुबो मोहनदास मंगतानी, भगवान टोपनदास ललवानी(सर्वजण रा. पिंपरी) आणि मिलिंद भागवत पोखरकर(रा.तळेगाव दाभाडे) यांच्या विरूध्द् 15 महिन्यांनंतर गुन्हा रजि.नं. 11/2016 नोंदवला. मात्र सात इसमांपैकी शीतल तेजवानी, संध्या मारूती सूर्यवंशी (दोघे रा. पिंपरी) आणि विनय विवेक आरानाह (रा.पुणे) या तिघांना पोलीसांनी वगळून वडगाव मावळ दिवाणी व फौजदारी न्यायालयात चार जणांविरोधातच आरोपपत्र दाखल केले. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे फौजदारी खटला नं.28/2017 नोंद झाला.

याप्रमाणे खटला सुरू असताना आरोपी मिलिंद भागवत पोखरकर व भगवान टोपणदास ललवानी यांनी त्यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचा दावा करत भारतीय दंड विधान कलम 420, 464, 467, 471, व 34 अन्वये आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आलेल्या आरोपातून दोषमुक्त करावे व सदर खटल्यातून त्यांना वगळण्याबाबत सदर प्रकरणात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.के. गायकवाड यांनी दोन्ही आरोपींचे वकील, सरकारी वकील आणि मूळ तक्रारदारांचे वकील यांचे युक्तीवाद ऐकूण तसेच आरोपपत्रात दाखल असलेल्या कागदपत्रांची खातरजमा करून पोखरकर व ललवानी यांनी प्रथमदर्शनी गुन्हा केल्याचे निदर्शनास येत असल्याचा निष्कर्ष देत या दोन्ही आरोपींचे अर्ज 7 मे 2019 रोजी फेटाळून लावले असल्याचे अॅड. सुभाष देसाई व अॅड.कुणाल खळदे यांनी सांगितले. याकामी सरकारी वकील म्हणून श्री. कोळेकर, फिर्याददार सुभाष खळदे यांच्यातर्फे अॅड सुभाष देसाई यांनी बाजू मांडली.

दरम्यान, वडगाव मावळ पोलीसांनी केलेल्या अगोदरच्या तपासात त्रुटी असून तपासातील दिरंगाई आणि पाच वर्षांनंतरही वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन तपासी अधिका-यांनी शीतल तेजवानी, संध्या मारूती सूर्यवंशी आणि विनय विवेक आरानाह या वगळलेल्या इसमांबाबत तक्रार अर्जानुसार गुन्ह्याचा पूर्ण तपास न केल्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की सदर तिन्ही इसमांची 15 दिवसांच्या मुदतीत चौकशी/तपास करून तथ्य आढळल्यास पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची विनंती सुभाष खळदे यांनी केली आहे.

गुन्हेगारी जगतात जसा मुळशी पॅटर्न तसाच मावळ पॅटर्न

जसा मुळशी पॅटर्न तसाच मावळ पॅटर्नही गुन्हेगारी जगतातील गंभीर प्रकरण आहे. त्यात काही भ्रष्ट महसूल व पोलीस अधिकारी मोठा अडसर आहेत. न्यायालयापर्यंत पोचण्यास विलंब करणे, संघटीतपणे गुन्हे दाखल असताना त्यापैकी काहींना आरोपपत्रातून वगळणे आणि कायद्यातून पळवाटा काढण्यासाठी तपासात मुद्दामहून त्रुटी ठेवणे अशा अर्थपूर्ण कारणांने न्याय मिळण्यासाठी विलंब होतो. त्याचे खापर न्यायालयावर फोडून चालणार नाही. न्याय मिळविण्यासाठी प्रदीर्घकाळ न्यायालयीन लढा देणे सर्वसामान्यांना अवघड असताना देखील जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झालेल्या मावळातील अनेक शेतकरी आणि जमिन मालकांचा न्यायालयावरील विश्वास यानिकालामुळे अधिक धृढ होणारा आहे. – अॅड सुभाष देसाई

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.