BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : ‘साहित्य कला आणि संस्कृती मंडळाचे पावसावरील काव्यसंमेलन उत्साहात

एमपीसी न्यूज़ – “मी घरी येताना, तुझ्या आठवणींचा, पाऊस घेऊन येतो..” ही कविता सादर केली इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवी डॉ. संभाजी मलघे यांनी. आपल्या आगामी ‘वेदनांचे चेहेरे’ या काव्यसंग्रहातील पावसावरची ही कविता प्राचार्य आणि कवी डॉ. संभाजी मलघे यांनी सादर केली. निमित्त होते तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी स्थापन केलेल्या ‘साहित्य कला आणि संस्कृती मंडळ’,  आयोजित ‘पाऊस’ या विषयावर काव्यसंमेलनाचे. शनिवारी (दि. २४) इंद्रायणी महाविद्यालयाच्या बी. फार्मसी सभागृहात संस्था व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.  हे काव्यसंमेलन उत्साहात पार पडले. 

या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष म. सा. प. खेड तालुका शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे, स्वागताध्यक्ष वडगाव मावळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे हे होते.

या काव्यसंमेलनाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली दाभाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी व कवी रमेश वाकनीस व कवी प्रा. विश्वास वसेकर, संस्थेचे विश्वस्त व अध्यक्ष अॅड सहदेव मखामले, संस्थेचे कार्याध्यक्ष व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, कवी अर्जुन गायकवाड, डॉ. बाळासाहेब गायकवाड, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी वडगांव मावळ येथील बाफना महाविद्यालयाचे प्राध्यापक व कवी अशोक गायकवाड यांनी,”राबणाऱ्या रक्तात,पाऊस शोधतो मी महापुरात बुडणाऱ्या माणुसकीत,पाऊस शोधतो मी” ही कविता पहाडी आवाजात सादर केली. यावेळी कवी अर्जुन गायकवाड, कृष्ण पुरंदरे, विक्रांत शेळके, ऋचा कर्वे,मीनाक्षी  भरड, श्रीकांत पेंडसे, अपर्णा दानी, सहभागी कवींनी पाऊस व पावसाच्या विविध रूपांच्या कविता सादर केल्या.

यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व कवी रमेश वाकनीस यांनी कवितेला एक परिभाषा असते. कविता कशी सादर करावी, ‘ती कशी फुलवत न्यावी’ याविषयी भाष्य करून आपली पावसावरची कविता गाऊन सादर केली. तर प्रा.विश्वास वसेकर यांनी, “माणसाला आपल्या भावना व्यक्त करताना इतरांना सामावून घेतल्याशिवाय राहवत नाही. तशीच कवींची प्रतिभा आपल्याला समजावून घ्यायची असेल तर त्यांच्या शब्दाशब्दातील भावना समजावून घेतल्याशिवाय आपल्याला कविता नीट समजणार नाही.”

तर अध्यक्षीय भाषणात कवी संतोष गाढवे यांनी, “वास्तववादी असणे आज काळाची गरज आहे. ते वास्तव आजच्या पावसाच्या कवितेतून दिसून आले. मात्र नव कवींनी कवितेचा इतिहास व चांगल्या कवींना वाचण्याची गरज असल्याचेही नमूद केले.

विक्रम  शेळके यांची ‘ पावसा तू गद्दार झाला’ ही कविता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून गेली. अध्यक्षीय भाषणात कविवर्य संतोष गाढवे यांनी कवी शेळके कवी मलघे यांच्या कविता अस्वस्थ करणाऱ्या उत्तम असल्याचा उल्लेख केला. ऋचा कर्वे  यांनी सूत्रसंचालन केले तर कवी अशोक गायकवाड यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like