Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्रात समता, बंधुता आणि मानवतेवर साहित्यिकांचा भर

डॉ. शरणकुमार लिंबाळे लिखित 'सनातन' कादंबरीच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : दलित साहित्य हे संवेदनशील समाज मनाला अस्वस्थ (Talegaon Dabhade) करणारे आहे. ते आनंद देणारे नसून अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करत गुलामी झुगारून समता आणि बंधुता असलेल्या स्वातंत्र्यासाठी चळवळ पुढे नेणाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन ‘सनातन’कार डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी तळेगाव दाभाडे येथे केले. इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. भारतातील सर्व भाषांतील सर्वोत्तम कादंबरी म्हणून के. के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे सरस्वती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित ‘सनातन’ या कादंबरीच्या चतुर्थ आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे उपस्थित होते.

यावेळी माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर, हिंदी साहित्यिक समीक्षक दामोदर खडसे,विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, प्रा. लक्ष्मण गायकवाड, आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन’आणि इंद्रायणी महाविद्यालय मराठी विभागातर्फे आयोजित या चर्चासत्राचे उदघाटन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘मराठी कादंबरी आणि डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या कादंबऱ्या’ या विषयावरील तीन सत्रात साहित्यिक,अभ्यासक आणि संशोधन (Talegaon Dabhade) करणारे विद्यार्थी यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.

दरम्यान, इंद्रायणी महाविद्यालयातर्फे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला. त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ साहित्यिकांनी डॉ. लिंबाळे यांच्या लेखनप्रवासातील संघर्ष, तळमळ आणि वैशिष्ट्ये यावर मनोगते व्यक्त केली.

डॉ. विद्यासागर म्हणाले, की वैश्विक व्यापकता असलेली ‘सनातन’ कादंबरी सनातन हिंदू धर्माकडे एक बोट दाखवत असली तरी चार बोटे आपल्याकडे असल्याचे निर्देशित करणारी सर्वांना अंतर्मुख करणारी साहित्यकृती आहे.धर्माच्या नावावर एकवटलेले भेदभावरंजित स्तर मोडीत काढून सर्व समाजांनी एकत्र येत सामाजिक न्याय सापेक्ष समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कादंबरी विचार करायला लावते. धर्म महत्वाचा की मानवता? धर्म महत्वाचा की समता, बंधुता, माणुसकी? असा रोखठोक सवाल डॉ. विद्यासागर यांनी यावेळी केला.

प्रकट मुलाखतीत अश्रुंना दिली वाट –

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे कबूल करताना डॉ. लिंबाळे यांना अश्रू अनावर झाले. राजकारणात न जाण्याचे ठामपणे सांगत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणेची ही चळवळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार असल्याचा निर्धार त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दाखल व्यक्त केला.

प्रा. दामोदर खडसे यांनी हिंदी भाषेतील अनुवादाचे महत्त्व अधोरेखित करताना लिंबाळे यांच्या सर्व कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये सांगितली. राजीव बर्वे यांनी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या समृद्ध साहित्याची दखल मराठी साहित्य जगताने म्हणावी तशी न घेतल्याबाबत खंत व्यक्त केली.

तळेगाव दाभाडे परिसरातील संत भूमीत राष्ट्रीय चर्चासत्र आणि प्रकाशन सोहळा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रा. लक्ष्मण गायकवाड म्हणाले, की उपेक्षित वर्गाला न्याय देणारे वैश्विक साहित्य निर्माण करणाऱ्या डॉ. लिंबाळे यांनी स्थिर पावलेल्या (Talegaon Dabhade) मराठी भाषेला प्रवाहित केले आहे.

माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे ‘सनातन’ कादंबरीचा आकृतिबंध, भाषा शैली आणि साहित्यीक सौंदर्य शास्त्र यावर विश्लेषण केले. त्या म्हणाल्या, की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षे केलेल्या शोषणाची नुकसान भरपाई आरक्षणाने भरून निघणार नाही, तर घटनेतील समता आणि बंधुभावही त्यासाठी आवश्यक आहे. अत्यंत अस्वस्थ करणारे हे साहित्य वाचून आपल्या वर्तमानातील भेदभावांच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचे आवाहन डॉ. धोंगडे यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे डॉ. संदीप कांबळे, प्रा. सत्यजित खांडगे आणि संयोजकांनी डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अखेरच्या इच्छेचा मान राखून एका विद्रोही साहित्यकाराच्या उपस्थितीत त्यांचा कादंबऱ्यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे यांनी केले आणि सूत्रसंचालन डॉ संदीप कांबळे यांनी तर प्रा सत्यजित खांडगे यांनी आभार मानले.

Wakad : दहावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या मुलाला केली टोळक्याने मारहाण

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.