Talegaon Dabhade: एल अँड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांचे उपोषण अखेर मागे

आमदार बाळा भेगडे यांच्या शिष्टाईनंतर कामगारांच्या बहुतांश मागण्या मान्य

एमपीसी न्यूज – आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शिष्टाईने स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला असून योग्य तोडगा निघाल्याने तळेगाव-आंबी एमआयडीसीतील एल अँड टी डिफेन्स कंपनीच्या कामगारांनी सोमवारी (दि.11) मध्यरात्री 15 दिवसांचे ठिय्या आंदोलन तसेच चार दिवसांचे उपोषण अखेर मागे घेतले. आमदारांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले.

शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजय पाळेकर, चिटणीस रवींद्र साठे, राजेंद्र पवार, रोहन आहेर, संघटक विक्रम गव्हाळे, दिलीप नखाते, कामगार प्रतिनिधी महेश बिराजदार, महेंद्र शिंदे यांच्याशी आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

कंपनी व्यवस्थापनाचे प्रकल्प प्रमुख ब्रिजेश कालरा व कंपनीचे कार्पोरेट एचआर हेड एम. लक्ष्मण यांच्याशी कामगारांच्या प्रमुख मागण्यांबाबत प्रदीर्घ काळ वाटाघाटी झाल्या.

आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे, मावळ पंचायतीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, तुषार ठाणेकर आदींच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून मध्यस्थी केली.

बेकायदेशीररित्या कामावरून काढलेल्या 9 कायम कामगारांना त्वरीत कामावर घ्यावे. जे कायम कामगार (40) संपावर आहेत त्यांना संप काळातील 15 दिवसांचे वेतन मिळावे. स्थानिक 149 भूमिपुत्रांना कंत्राटी कामगार म्हणून त्वरीत कामावर घ्यावे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या.

149 कामगारांना कामावर घ्यायला व्यवस्थापनाने मान्यता दिली. 9 कामगारांचे उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या 40 कायम कामगारांनाही कामावर रुजू करून घेण्यात येणार असून त्यांना 15 दिवसांचे वेतन दिले जाईल व निलंबित नऊ कामगारांचा संप मिटेपर्यंतचा पगार देण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

निलंबित कामगारांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असून न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याचे कामगार प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. बेमुदत उपोषणाला बसलेल्या चार कामगारांपैकी सदानंद मुतकेकर व आनंद दंडगल यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा संप मिटल्याने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी पुन्हा मिळणार असल्याने कामगारक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने योग्य तोडगा निघू शकला, असे आमदार भेगडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. समाधानकारक वाटाघाटीने संप मिटल्याने स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला असून हा ऐतिहासिक निर्णय झाला असल्याचे अॅड. विजय पाळेकर यांनी शिवक्रांती कामगार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत जाहीर केले. या निर्णयाचे सगळीकडे स्वागत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.