Talegaon : थकबाकी मागणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण; पोलिसांत तक्रार दिल्यास हात-पाय तोडण्याची धमकी

एमपीसी न्यूज – विजेचे थकलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमध्ये घेऊन जाऊन मारहाण केली. तसेच याबाबत पोलिसात अथवा महावितरणच्या अधिका-यांना सांगितल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी बारा वाजता सोमाटणे फाटा येथे घडली.

नीलेश नानाभाऊ कहाळे (वय 26, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल अप्पासाहेब गोपाळे (रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कहाळे आणि त्यांचे सहकारी महेश भांगे वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेनुसार ज्या ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्या ग्राहकांच्या घरी जाऊन वीजबिल जमा करणे अथवा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करीत होते. आरोपी अमोल गोपाळे याचे आठ हजार रुपये वीजबिल बाकी होते. त्यामुळे कहाळे यांनी गोपाळे याला वीजबिलाची मागणी केली. आरोपी गोपाळे याने फिर्यादी यांना त्यांच्या कारमध्ये बसवून मारहाण केली. ‘तू माझ्याकडे लाईट बिलाचे पैसे का मागतोस’ असे म्हणत सोमाटणे बाजारपेठ येथे कारमधून नेऊन तिथेही मारहाण केली. ‘जर तू पोलिसांना किंवा इतर अधिका-यांना सांगितले, तर मी तुझे हात-पाय काढून टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली.

पोलिसांनी गोपाळे विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता मठपती, उपकार्यकारी अभियंता जाधव, सहाय्यक अभियंता कापरे, झोपे हे अधिकारी कर्मचा-याच्या बाजूने उभे राहिले. तळेगाव आणि वडगाव येथील महावितरणच्या कामगारांनी या पार्श्वभूमीवर कामबंद आंदोलन केले. किशोर आवारे यांनी मध्यस्थी करून महावितरण कृती समिती युनियनचे किरण ढोरे व कामगारांना कामावर येण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.