Talegaon Dabhade : कलापिनीमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज- मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कलापिनी युवक कलाकारांनी विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्या कवितांचे सादरीकरण करून या महाकवींना मानवंदना दिली.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे काव्य अभिवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे “विंदोबाच्या राज्यात” चे दिग्दर्शक होते श्रीधर कुलकर्णी. त्यांनी चेतन पंडित, तेजस्विनी गांधी, मुक्ता भावसार या सहकाऱ्यांसह कलापिनी केंद्रात मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांना विंदोबाच्या राज्याची सफर घडवली.
एटूंचा देश, डरा, भुतावळ, पंढरपूरच्या कविता अशा एकाहून एक कविता छान सूत्रात गुंफून सादर झाल्या. बोलगाणी शोभा जोशी व सोनाली देशमुख यांनी समर्थपणे सादर केली.
प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ दीपक गंगोळी यांनी कलापिनीच्या कलाकारांचे कौतुक केले व कलाकारांचा सत्कार केला. काव्य, कला यांची काठी आधारासाठी असेल तर कुठल्याही नैराश्य, अडचणी, संकटे यांना तोंड देता येते असे सांगितले.
साहित्य काव्य मंचाचे भारतकुमार शुक्ल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ अनंत परांजपे यांनी केले. विनायक काळे, शार्दूल गद्रे, हृतिक पाटील, अशोक बकरे,अनघा बुरसे, रश्मी पांढरे यांनी आयोजन केले.