Talegaon Dabhade: जनतेची लूट थांबविण्याची मावळचे आमदार सुनील शेळके यांची सूचना

Talegaon Dabhade: Maval MLA Sunil Shelke's instructions to stop looting of people हिंदमाता भुयारी मार्गातील सांडपाणी व्यवस्थापनाच्या 30 लाखांच्या कामासाठी 90 लाखांची निविदा? 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील हिंदमाता भुयारी मार्गामध्ये पावसाळ्याच्या काळात साठणाऱ्या पाण्याचा निचरा  करण्यासाठी सुरू असलेल्या पाईप- लाईनच्या कामासाठी बाजारभावाप्रमाणे 30 ते 35 लाख रुपये खर्च येत असताना 90 लाख रुपयांची निविदा सूचना काढण्यात आली असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी केला आहे.  ही निविदा रद्द करून कमी खर्चाची फेरनिविदा सूचना काढून जनतेच्या पैशांची लूट थांबवावी, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना त्यांनी यासंदर्भात पत्र पाठविले आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत हिंदमाता भुयारी  मार्गामध्ये पावसाळ्याच्या काळात साठत असणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चालू असलेल्या पाइपलाइनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात खर्चात वाढ होताना दिसत आहे. सदर काम हे 30 ते 35 लाखात बाजार भावाने पूर्ण होत असताना देखील या कामाची निविदा 90 लाख रुपये काढण्यात आली आहे, असा आरोप आमदार शेळके यांनी पत्रात केला आहे.

सदर कामाची माहिती घेतली असता जो पाईप या कामाअंतर्गत वापरला गेला आहे त्याचे बाजारभावाप्रमाणे मूल्य 9 ते 10 हजार रुपये असताना हेच पाईप 22 ते 23 हजार रुपये दराने निविदेत दाखवले गेले आहे आणि याच कामामध्ये जेसीबी व पोकलंड उत्खननामध्ये 70 ते 80 रुपये घनमीटर बाजारात दर चालू असताना  160 ते 170 रुपये दर निविदेमध्ये निश्चित केला आहे, याकडे त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

सध्या आपला देश व महाराष्ट्र कोरोनामुळे आर्थिक संकटात असताना तसेच नुकतेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने केलेली करवाढ पाहता जनतेच्या पैशांचा होणारा अपव्यय टाळावा. सदर मंजूर केलेल्या निविदेचा फेरविचार करून 90 लाखांचा अंदाजित खर्च असलेली निविदा 30 ते 35 लाख रुपयांची करावी, अशी सूचना आमदार शेळके यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.

आपणास ही बाब मागील 15 दिवसांपूर्वी निदर्शनास आणून देखील आपण यावर काहीही कार्यवाही केली नाही असे दिसून आले आहे, या शब्दांत आमदार शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या तीन-चार दिवसांत आपण या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी आणि जनतेच्या पैशांचा योग्य तो वापर करून जनसामान्यांना न्याय मिळवून द्यावा व तळेगाव दाभाडे शहरातील जनतेच्या पैशाची लूट थांबवावी, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.