Talegaon Dabhade: मावळातील जनतेने ‘जनता कर्फ्यू’मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे -सुनील शेळके

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधात सुरू असलेली लढाई जिंकण्यासाठी मावळातील प्रत्येक नागरिकाने येत्या रविवारी (दि. 22 मार्च) देशभर पाळण्यात येणाऱ्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये सहभागी होऊन मावळ तालुक्याला ‘कोरोना मुक्त’ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ‘मावळ’चे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध स्तरावर जनजागृती व उपक्रम राबवले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवार दि. 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना या राष्ट्रीय संकटाच्या काळात देशाचे सुजाण नागरिक या नात्याने मावळ तालुक्यातील जनतेेेने आपले राष्ट्रीय कर्तव्य व नैतिक जबाबदारी समजून त्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवा वगळता मावळ तालुक्यातील व्यापारी संकुल, औद्योगिक वसाहती व वैयक्तिक उद्योग व्यवसाय 100 टक्के बंद ठेवून तसेच आपापल्या घरी थांबून सहकार्य करावे, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

जगभर धुमाकूळ घालत असलेला कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्याने आपल्या देशापुढेही मोठे आव्हान उभे केले आहे. मावळ तालुक्याच्या शेजारीच असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजे कोरोना विषाणू मावळच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचलेला आहे. या पार्श्वभूमीवर मावळातील नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरीने व जबाबदारीने वागून कोरोना विषाणूला मावळात प्रवेश करण्यापासून रोखले पाहिजे, असे शेळके यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.