Talegaon Dabhade : नगरपरिषदेतील सत्तांतराच्या मुहूर्तावर आमदार सुनील शेळके यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेतही जनसेवा विकास समिती तसेच शहर विकास व सुधारणा समिती यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीत एकत्र येऊन सत्तारूढ भाजपचा पराभव केला. नगर परिषदेतील या सत्तांतरांचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरपरिषद सभागृहात विशेष सत्कारही करण्यात आला.

तळेगाव नगरपरिषदेचे माजी सदस्य व माजी उपनगराध्यक्ष असलेल्या सुनील शेळके यांची मावळ विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल नगरपरिषदेच्या वतीने शेळके यांचा हा सत्कार करण्यात आला. आमदारकीची निवडणूक होऊन तीन महिने झाल्यानंतर नगरपरिषदेतर्फे शेळके यांचा सत्कार झाल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.

तळेगाव नगरपरिषदेला विकासाचे मॉडेल बनविणार – शेळके
विकास कामासाठी नगरपरिषदेला शासकीय निधी कमी पडू देणार नाही. राज्यात तळेगाव दाभाडे नगरपरिषद विकासाचे मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

त्यावेळी मुख्याधिकारी दीपक झिंजाड,उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तळेगाव जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या तथा माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे,नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मावळते विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक गणेश खांडगे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका, नगरपरिषदेतील विविध खात्यांचे प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेळके म्हणाले, सभागृहाचे पावित्र्य जपणे ,जनतेची कामे करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन झाले असून भ्रष्टाचारमुक्त नगरपरिषदेचा कारभार करावयाचा आहे.

यावेळी वैशाली दाभाडे, गणेश खांडगे, नगरसेवक गणेश काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर शेळके यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली व 25 वर्षांनंतर तालुक्यात सत्तांतर झाले. नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर राज्यातील सत्ताही भाजपला गमवावी लागली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे देखील बदलू लागली.

असे घडले सत्तांतर!
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने जनसेवा विकास समितीबरोबर युती केली होती. नगराध्यक्षपदी भाजपच्या चित्रा जगनाडे विराजमान झाल्या. एकूण 26 पैकी 14 जागा जिंकत भाजपने बहुमत पण मिळवले. मित्र पक्ष असलेल्या जनसेवा विकास आघाडीने 6 जागा जिंकल्याने दोघांचे मिळून संख्याबळ 20 झाले. विरोधी पक्ष असलेल्या तळेगाव शहर विकास व सुधारणा समितीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेळके यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्या नंतर त्यांचे चुलत बंधू संदीप शेळके यांनी देखील भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ घटून 12 झाले. त्याचवेळी जनसेवा विकास समिती आणि शहर विकास व सुधारणा समिती या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विचारसरणीच्या दोन्ही आघाड्या स्थानिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र आल्या. रिक्त झालेल्या दोन्ही जागा पोटनिवडणुकीत भाजपला स्वतःकडे राखता आल्या नाहीत. सभागृहात भाजप 12 तर दोन्ही समित्या मिळून 14 संख्याबळ झाले आहे. नगराध्यक्षा भाजपच्या असल्याने त्याचे मत धरूनही भाजपकडे बहुमत उरले नाही. त्यामुळे उपनगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला 13 तर समितीला 14 मते मिळाली. त्यामुळे नगरपरिषदेतील सत्तांतरावर अखेर शिक्कामोर्तब झाले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like