Talegaon : वाढीव करआकारणी बाबत तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने वर्ष 2018 ते 2022 या कालावधीसाठी प्रस्तावित केलेली वाढीव करआकारणी बेकायदेशीर असून त्या विषयावर तातडीने नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्यासह नऊ नगरसेवकांनी केली आहे.

यासंदर्भात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यावर सुनील शेळके यांच्यासह माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, नगरसेविका शोभा भेगडे, संतोष शिंदे, संदीप शेळके, अमोल शेटे अनिता पवार, रोहित लांघे, प्राची हेंद्रे या नगरसेवकांच्या सह्या आहेत

नगरपरिषदेने 2018-2022 या कालावधीसाठी वार्षिक करनिश्चितीच्या नोटीसा नागरिकांना पाठविल्या असून करामध्ये बेकायदेशीरपणे मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून या करवाढीमागे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या गंभीर बाबीवर विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील सर्व मिळकतधारकांनी करमूल्यांकन नोटीसला हरकत घेणारे अर्ज दिलेल्या मुदतीत नगरपरिषदेत दाखल करावेत तसेच यासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत कोणीही नवीन वाढीव कर भरू नये, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.