Talegaon Dabhade: नगरपरिषदेच्या वतीने कम्युनिटी किचन व निवारा कक्षाची व्यवस्था

तळेगाव दाभाडे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव शहर परिसरातील राज्य व परराज्यातील मजूर, कामगार तसेच बेघर, निराधार यांच्यासाठी सामाजिक भोजन कक्ष (कम्युनिटी किचन) आणि ‘निवारा कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. कोणीही भोजन आणि निवारा यापासून वंचित राहू नये म्हणून शासकीय अनुदानातून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने ही सोय करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत नगरपरिषदेने 100 जणांच्या व्यवस्थेची तरतूद केली आहे. सध्या महिला व पुरुष मजूर मिळून 27 जण याचा लाभ घेत आहेत.  निवारा कक्ष नगरपरिषदेच्या वीर जिजामाता शाळा क्रमांक 5 येथे सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था  करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या कै. पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल येथे कम्युनिटी किचनची व्यवस्था करण्यात आली आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूधन बर्गे आणि मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी भेट देऊन ‘कम्युनिटी किचन’ आणि निवारा कक्षाची पाहणी केली. ‘कम्युनिटी किचन’ उपक्रमांतर्गत सकाळी चहा, नाष्टा तसेच दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी असलेल्या लाभार्थींची  औषधपाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे लाॅकडाऊनचा कालावधी वाढल्याने हाताला काम नसणारे मजूर, कामगार यांची उपासमारीपासून सुटका झाली आहे.

सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दानशूर व्यक्तींनी धान्य व वस्तू स्वरूपात मदत  करावी, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे. तळेगाव शहर परिसरात जेवणापासून वंचित असणारे मजूर, कामगार असतील तर त्यांनी नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, नाव नोंदणी करावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.