Talegaon Dabhade : प्लास्टिकच्या कपात चहा घेतला म्हणून नगरपरिषद कर्मचाऱ्यांला 500 रुपये दंड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे स्वच्छ सर्वेक्षणातील ‘शून्य कचरानिर्मिती व कचरा कमी करणे’या घटकाची अंमलबजावणी मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी कार्यालयापासूनच सुरु केली आहे. या घटकांची अंमलबजावणी न केल्यास कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. दि 9 जुलैपासून शून्य कचरा कार्यालय या आदेशाची अंमलबजावणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने सुरु केली आहे. या अंतर्गत दैनंदिन चहा किंवा कॉफीसाठी वापरले जाणारे पेपरचे कप, नाश्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरच्या प्लेट इत्यादी गोष्टींवर कार्यालयात बंदी घालण्यात आली आहे. चहा किंवा कॉफी पिण्यासाठी धातूचे किंवा चिनीमातीच्या कपांचा पर्याय ठेवण्यात आला आहे.

  • याशिवाय कार्यालय साफ ठेवणे, विभाग ते विभाग टिपणीकरिता कागदा ऐवजी ई- मेलचा वापर करणे, कागद व स्टेशनरीचा पुनर्वापर करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे या गोष्टी अंमलात आणल्या गेल्या आहेत. या आदेशाचे पालन नगरपरिषदेचे कर्मचारी  करत आहेत. मात्र, आदेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रति उल्लंघनासाठी 500 रूपयांचा दंड केला जात आहे. तसेच, नगर परिषदेमध्ये तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर नगरपरिषदेने कार्यवाही करण्यास सुरु केली असून आतापर्यंत 2 व्यक्तींना प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची जोरदार तयारी सुरु केली असून कार्यालयासमोर स्वच्छतेचा संदेश देणारी रांगोळी रोज काढली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like