Talegaon Dabhade : नगरपरिषद पोटनिवडणुकीत म्हाळसकर-शेळके यांच्यात सरळ लढत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7ब मधील पोट निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार पैकी दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके आणि सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा मारुती म्हाळसकर यांच्यात सरळ लढत होत आहे.

नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत या जागेवर सुनील शेळके हे भाजपच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

नगरपरिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास कमळ चिन्ह मिळाले असून आणि अपक्ष उमेदवारास कपबशी चिन्ह मिळाले आहे. या पोटनिवडणुकीत दुरंगी लढत होत आहे. या प्रभागात 9 जानेवारी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी रोजी होणार आहे.

अपक्ष उमेदवार गणेश वामन मोरे आणि हनुमंत सोपान म्हाळसकर या दोघांनीही शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार राहिले असून त्यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक सातमध्ये एकूण 3 हजार 893 मतदार आहेत. यामध्ये 2 हजार 94 पुरुष तर 1 हजार 799 स्त्री मतदारांचा समावेश आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like