BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शौनक अभिषेकी यांच्या सुरांत चिंब झाले तळेगावकर रसिक

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने कै. सुनील साने स्मृती संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक पं.शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाने तळेगावकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. 26 जानेवारी रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आग्रा घराण्याच्या गायक असलेल्या तसेच वडील आणि गुरु असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी यांचा वारसा लाभलेल्या शौनकजींनी आपल्या मैफिलीची सुरेल सुरुवात भूपाल तोडी रागातील नैया उतारो पार …….या बंदिशीने केली आणि तळेगावकर रसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली त्यानंतर द्रुत लयीतील कैसे रिझाऊ अब मनको…. ही बंदिश सादर केली व मैफिलीत रंग भरला. या नंतर देव गांधार रागातील बरजोरी ना करो रे कन्हाई….ही बंदिश व जौनपुरी रागातील का ऐसी छेड करत गिरीधारी……ही पंडीत बबनराव हळदणकर यांची बंदिश सादर केली.

मध्यंतरानंतर एक निरंजन ध्याऊ गुरुजी…हे निर्गुणी भजन सादर केले, नंतर शब्दा वाचून कळले सारे…..हे भावगीत सादर करून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि घेई छंद मकरंद ….आणि हे सुरांनो चंद्र व्हा ..ही नाट्यगीते सादर करून रसिकांची भरभरून दाद मिळवली व रसिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सांगता सर्वात्मका सर्वेश्वरा…व ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या भैरवीने केली आणि रसिकांना तृप्त केले.

गायक राग सादर करताना रसिक त्यात रंगून जातात त्यालाच रागदारी म्हणतात असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. संवादिनीवर उदय कुलकर्णी व तबल्यावर सुभाष कामत यांनी केलेली सुंदर साथसंगत ही वेळोवेळी तळेगावकर रसिकांची दाद मिळवणारी, गाण्याच्या उंचीला साजेशी व तळेगावकर रसिकांच्या कानाची तृप्तता करणारी होती. तानपुऱ्यावर सत्यजित बेडेकर व राज शहा यांनी तर अतुल गरुड यांनी टाळाची साथ केली. अडीच तास चाललेल्या या अवीट कार्यक्रमाला तळेगावकर रसिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

या वर्षी श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने ‘सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कार तळेगावातील वंदनीय व्यक्तिमत्व श्री अभय लिमये (लिमये गुरुजी) यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तळेगावातील उद्योजक मा. रामदास काकडे, नम्रता बिल्डर्सचे शैलेश शहा, प्रसन्न लेले आणि संजय साने यांनी अर्थसहाय्य केले. कार्यक्रमाला केलेली आसन व्यवस्था, कार्यक्रमाची उंची वाढवणारी होती (रवींद्र धारणे). कार्यक्रमाचे अप्रतिम ध्वनीसंयोजन हेमंत उत्तेकर यांचे होते. श्रीकांत चेपे यांनी व्हिडिओ मुद्रण आणि छायाचित्रण केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कांचन सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त डॉ. किरण देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीरंगच्या पं. शरद जोशी, सुखेंदू कुलकर्णी, रवींद्र धारणे, संजय साने, उद्धव चितळे, निरुपा कानिटकर, राजीव कुमठेकर, दीपक बिचे, सुचेता बिचे, विलास रानडे, निंबळे सर, दीपक आपटे, विनय कशेळकर आणि विश्वास देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

.

HB_POST_END_FTR-A1
.