Talegaon Dabhade : करवाढ , अतिक्रमण विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

एमपीसी न्यूज – सन 2012-18 पर्यंतची करवाढ रद्द करावी, सर्व मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, स्वच्छता कर संपूर्ण सरसकट माफ करावा आणि सुनावणी नियमानुसार झाली नसल्याने करवाढ स्थगीत करावी, या मागण्यांसाठी तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीतर्फे नगरपरिषदेसमोर आज, गुरुवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे म्हणाले, ” सत्ताधा-यांच्या दबावाखाली प्रशासन चुकीची कामे करत असून त्यातून अन्यायकारक करवाढ आणि अतिक्रमणाची कारवाई करून नागरिकांवर अन्याय होत आहे. जीएसटी, महागाई, करवाढ यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधा-यांनी प्रशासनाच्या माध्यमातून शहरात अतिक्रमणाच्या कारवाईचा डाव रचला असल्याचा स्पष्ट आरोप भेगडे यांनी केला.

या आंदोलनात पक्षाचे शहराध्यक्ष गणेश काकडे, समितीचे अध्यक्ष बबनराव भेगडे, राट्रवादी युवतीच्या पश्चिम विभाग प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे, पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा राऊत, महिला शहराध्यक्षा सुनीता काळोखे, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक अरूण माने, संतोष भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, अल्पसंख्यांक सेलच्या महिला तालुकाध्यक्षा शबनम खान, माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ चौधरी, सुरेश धोत्रे, बाबुलाल नालबंद, सूर्यकांत काळोखे, तनुजा जगनाडे, सुमित्रा दौंडकर, युवक शहराघ्यक्ष आशिष खांडगे, महेश फलके, अयुब सिकिलकर, विशाल पवार, सोमा भेगडे, मिलिंद अच्युत आदी उपस्थित होते.

सत्ताधा-यांनी नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम प्रशासनावर दबाव टाकून केले असल्याचा आरोप किशोर भेगडे यांनी यावेळी केला. ते म्हणाले,” सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला डावलून फेरीवाला संरक्षण धोरणाची अंमलबजावणी न करता अनेकांच्या पोटावर पाय देण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. टपरीधारकांचे पुनर्वसन दुस-याच्या मालकीच्या जागेवर करण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत” लोकांची दिशाभूल थांबवावी आणि संपूर्ण करवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी गणेश काकडे, माया भेगडे, बबनराव भेगडे यांनीही करवाढ आणि अतिक्रमण कारवाईचा उल्लेख करून सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. नंदकुमार कोतूळकर, विजय काळोखे, नारायण ठाकर, शिवाजी आगळे, पैलवान गणेश खांडगे, राजीव फलके आदींची भाषणे झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.