Talegaon Dabhade : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुसंगत – डाॅ पंडित विद्यासागर 

एमपीसी न्यूज – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थी आणि शिक्षक या दोन मध्यवर्ती (Talegaon Dabhade) घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक स्वागतार्ह बाबी आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या धोरणाची आखणी करण्यात आली आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्हींसाठीही सुसंगत असल्याचे मत स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

 

 

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव,इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे,बी फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे,डी फार्मसीचे प्राचार्य डॉ.गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. विद्यासागर म्हणाले की,आपल्याकडे शिक्षणपद्धती ही अनेक स्तरात विभागली गेलेली आहे. यांना जोडणारा एक समान धागा असावा व त्यातून शिक्षणपद्धतीची अंमलबजावणी त्यातील त्रुटी दूर करून शिक्षकांनी प्रभावीपणे करावी. आपल्याकडे प्रचलित शिक्षण व्यवस्थेत काही बाबी चांगल्या तर काही चुकीच्या आहेत. या चुका टाळून विद्यार्थ्यांमध्ये आंतरविद्याशाखीय अभ्यासाची गोडी उत्पन्न व्हावी,विद्यार्थ्यांमधील अंगभूत कौशल्य विकसित व्हावी तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधकीय वृत्ती विकसित होण्याच्या दृष्टिने नवीन शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने बनविले गेले असल्याचे मत डॉ विद्यासागर यांनी असे मत व्यक्त केले.
या वेळी उपस्थित शिक्षक वर्गाला संबोधित करताना डॉ. मनोहर जाधव यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबाजावणीसाठी  विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन पातळीवरील आव्हानांची चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देण्यासाठी अंतर्भूत केलेल्या अंतरविद्याशाखीय धोरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींचा उहापोह त्यांनी केला.तसेच कौशल्याधारीत बदलत्या शैक्षणिक जाणीवांसोबत शिक्षकांनीही बदलायला हवे असे मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले.

 

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी अशा प्रकारची मार्गदर्शनपर सत्रे अनेक शैक्षणिक संकुलांत आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. या व्याख्यानामुळे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षकांमध्ये असलेले संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याने समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.या प्रसंगी आयोजक म्हणून आपली भूमिका व्यक्त करताना डॉ. मलघे म्हणाले की, नवे शैक्षणिक धोरण येणार असे अनेक दिवसांपासून आपण ऐकतोय पण त्यातील तरतुदी काय आहेत? त्याची अंमलबजावणी कशी असेल.? अभ्यासक्रमात होणारा बदल कसा असेल? शिक्षक भरतीवर याचा (Talegaon Dabhade) होणारा परिणाम कसा असेल? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे संस्थेतील सर्व शिक्षकांना मिळावीत म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सत्यजित खांडगे यांनी केले तर आभार बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.