Talegaon Dabhade News : दाभाडे राजघराण्याने पंढरपूरच्या विठ्ठलचरणी अर्पण केलेल्या दागिने आणि वस्तूंचा उल्लेख असलेला ऐतिहासिक दस्तऐवज सापडला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती सरदार दाभाडे राजघराण्याने अनेक देवस्थानांसाठी काही बांधकामे केली आहेत व काही वस्तू अर्पण केल्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण असणारा मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवज सापडला आहे. त्यामध्ये दाभाडे राजघराण्याने पंढरपूरच्या विठ्ठल चरणी सुवर्ण व रत्नजडित दागिने आणि वस्तू अर्पण केल्याची नोंद आहे.

सरसेनापती सरदार दाभाडे राजघराण्याने वणीच्या देवीला पायऱ्या बांधल्या, जेजुरीच्या खंडोबाला सोन्याचा कळस चढविला, खंडोबा मंदिराची भिंत बांधली, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा पूर्व दरवाजा बांधला आहे. राज्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये अशा प्रकारे दाभाडे राजघराण्याने सेवा अर्पण केली आहे. मात्र काहींचा उल्लेख आढळतो तर काहींचा उल्लेख इतिहासासोबत विस्मरणात गेल्याचे दिसते.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील ह.भ.प. अशितोषराव अनिलराव बडवे पाटील यांच्या घरात एक दुर्मिळ दस्तऐवज सापडला. त्यामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याने श्री विठ्ठलाला काही सुवर्ण व रत्नजडित दागिने आणि वस्तू अर्पण केल्याची नोंद मिळते. हा दस्तऐवज मोडी लिपीत आहे. त्यावर ही सेवा अर्पण केल्याच्या तारखेचा उल्लेख नसून पंढरपूर येथील रहिवासी केशव पटवर्धन तथा बाबा फडणीस यांनी त्यांच्या स्मरणातील माहिती सन 1879 मध्ये लिहून काढली आहे. त्यामध्ये दाभाडे राजघराण्याने श्री विठ्ठल चरणी अर्पण केलेल्या सेवेचा उल्लेख आहे.

सरदार सत्यशिलराजे दाभाडे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले की, ‘इतिहासातील ही अत्यंत महत्वाची माहिती मिळाली आहे. ही बाब खूप आनंदाची आहे. अनेक दुर्मिळ ऐतिहासिक माहिती लोकांसमोर येणे गरजेचे आहे. दाभाडे राजघराणे सुरुवातीपासून श्री विठ्ठल भक्ती करीत आहे. दाभाडे राजघराण्याचे अश्व देखील पालखीसोबत विठ्ठल भेटीसाठी अनेक वर्षे जात होते.’

मोडी लिपीत मिळालेल्या दस्तऐवजानुसार सरसेनापती सरदार दाभाडे राजघराण्याने श्री विठ्ठलाला अर्पण केलेली सेवा –

# कंठी पाच पदरी सोन्याचे पदक जडावाचे हिऱ्याचे – 1000 रुपये
# तांबड्या खड्याचा शिरपेच – 500 रुपये
# ताट वाट्या – 125 रुपये
# तांब्या, पंचपात्रे, विड्याचे सामान – 250 रुपये
# सेजघरातील धाकटी समई – 250 रुपये
एकूण – 2 हजार 125 रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.