Talegaon Dabhade News: मायमर हॉस्पिटल अधिग्रहित करून उच्चस्तरीय चौकशी करा – सत्यशीलराजे दाभाडे

एमपीसी न्यूज – कोरोना महामारी संपेपर्यंत मायमर मेडिकल हॉस्पिटलचा कारभार त्यांच्या व्यवस्थापनाकडून काढून घेऊन राज्य सरकारने लवकरात लवकर हाती घ्यावा तसेच मायमर हॉस्पिटलची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी या संदर्भात सविस्तर पत्र पाठविले आहे. मायमर रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असून गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू आहे, असा आरोप सत्यशीलराजे यांनी केला आहे.

दाभाडे यांनी पत्रात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल ज्या जमिनीवर उभे आहे, ती जमीन त्यांचे पणजोबा व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत सरदार सरसेनापती यशवंतराव खंडेराव दाभाडे (तिसरे) यांनी स्वतःच्या मालकीची जमीन मावळ तालुक्‍यातील व इतर पंचक्रोशीतील रुग्णांच्या सोयीसाठी व चांगल्या उपचारांसाठी भाडेेतत्त्वावर देऊ केली होती.

एकेकाळी तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल आपल्या देशात इतके नावाजले गेले होते की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील 14 नोव्हेंबर 1945 ला या हॉस्पिटलला भेट दिली होती, याकडे दाभाडे यांनी लक्ष वेधले आहे.

सध्या याच जमिनीवर मायमर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल उभे आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये या हॉस्पिटलमध्ये भोंगळ व संतापजनक कारभार चालू असल्याचे लक्षात आले आहे. या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचा कारभार अत्यंत संशयास्पद आहे, असा आक्षेप दाभाडे यांनी घेतला आहे.

जो दृष्टिकोन ठेऊन पणजोबा श्रीमंत सरदार सरसेनापती यशवंतराव खंडेराव दाभाडे (तिसरे) यांनी तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलला जमीन दिली होती, तोच दृष्टिकोन समोर ठेऊन मायमरच्या व्यवस्थापक, डॉक्टर्स व स्टाफनी रुग्णसेवा करायला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही, असेे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीचा देह कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवणे व पैश्याअभावी त्याच्या नातेवाईकाना परत न करणे, भाडेतत्वावर असलेल्या व्यवस्थापकांनी स्वतःचा मालकी हक्क गाजवणे, स्थानिक समाजसेवक व लोकप्रतिनिधी यांचेे फोन न घेणे, जनतेबरोबर उर्मटपणे बोलणे हे अतिशय खेदजनक व दुर्दैवी आहे, असे दाभाडे यांनी म्हटले आहे.

या खेरीज, हॉस्पिटल मध्ये व्हेंटिलेटर हे अपुरे असून, पीएम फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर यांचा देखील वापर केला जात नाही. तसेच कर्मचारी वर्ग सुद्धा अपुरा आहे. हॉस्पिटल हे सक्षमपणे चालवण्यासाठी ज्या व्यवस्था पाहिजेत त्या दिसून येत नाहीत, अशा अनेक बाबी कानावर व वाचण्यात येत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आधी देखील एका वृद्ध महिलेला कोरोनाच्या उपचारासाठी साठी हॉस्पिटलने वेळेवर दाखल करून न घेतल्याने त्या महिलेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. अशा गोष्टी या हॉस्पिटल मध्ये घडल्या आहेत, याकडे सत्यशीलराजेे दाभाडे यांनी लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या हॉस्पिटलमधील संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता, मायमर मेडिकल हॉस्पिटलची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी आपण एक समिती स्थापन करून या सर्व बाबींच्या सखोल चौकशीचे आदेश द्यावेत. तसेच कोरोना महामारी संपेपर्यंत मायमर मेडिकल हॉस्पिटलचे कारभार त्यांच्या व्यवस्थापनाकडून काढून घेऊन महाराष्ट्र राज्य सरकार यांनी कारभार लवकरात लवकर हाती घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.