Talegaon Dabhade News: आठ सदस्यीय समिती मंगळवारी करणार मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी

पैशाअभावी कोरोना मृतदेह तीन दिवस ठेवला होता कोल्ड स्टोरेजमध्ये

एमपीसी न्यूज – बिलाअभावी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवल्या प्रकरणी तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेजची चौकशी करण्यासाठी आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. ही समिती उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता कॉलेजची चौकशी करणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी हा प्रकार उघडकीस आणत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. त्याअनुषंगाने मायमर कॉलेची चौकशी होणार आहे.

गणेश शंकर लोके (वय-50) यांचा मायमर मेडिकल कॉलेजने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बिलाचे पैसे दिले नसल्याने कॉलेजने नातेवाईकांना मृतदेह देण्यास नकार दिला होता. मृतदेह तीन दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. त्यावरून खासदार बारणे यांनी कॉलेजमध्ये जात प्रशासनाला खडेबोल सुनावत  संताप व्यक्त केला होता.

याप्रकरणी कोरोना आढावा बैठकीत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार मायमर काॅलेज प्रशासना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश यांचा मुलगा सुधीर गणेश लोके (वय-23, रा. मळवली, मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेडिकल प्रोटोकॉलच्या वापराबाबत तपासणी करणे, कोविड अंतर्गत औषध प्रणाली, वैद्यकीय देयके यांची पडताळणी करणे, ऑक्सिजन व्यवस्था, फायर ऑडीट, इलेक्ट्रिकल ऑडीट संबधी केलेल्या कारवाईची खात्री करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गणेश लोके यांच्या मायमर मेडिकल कॉलेज व भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय येथील मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी आणि इतर मुद्याबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीत डॉ. दिलीप कदम, डॉ. बोरसे, गौतम जगदाळे, पी.एम.पाटील, संदेश शिर्के, डॉ. भगवान पवार, डॉ. अशोक नांदापूरकर यांचा समावेश आहे. ही समिती उद्या (मंगळवारी) दुपारी एक वाजता कॉलेजची चौकशी करणार आहे.

कॉलेजच्या अधीष्ठता यांनी समितीस संबंधित विषयी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. मयत गणेश शंकर लोके यांच्या नातेवाईकांना चौकशी समिती समोर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्याचे निर्देश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मायमर मेडिकल  कॉलेजमध्ये कोरोनाचे उपचार सुरू असताना गणेश लोके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बिलाचे पैसे दिले नसल्याने तीन दिवस मृतदेह  ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवला होता. कायद्यानुसार मृत झालेल्या व्यक्तीची तत्काळ पोलिसांना खबर द्यावी लागते. असा मृतदेह ठेवता येत नाही. मृत्यू झाल्याची खबर दिल्यानंतर रुग्ण मृत गणला जातो असा शासन नियम आहे. मायमर मेडिकल  कॉलेजमध्ये  अपुऱ्या सुविधा आहेत. ऑक्सिजन, मान्यता घेतलेल्या क्षमतेने बेडची सुविधा आहे का, पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर धूळखात पडून आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी यासाठी मी विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. त्याअनुषंगाने कॉलेजची चौकशी होत  आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.