Talegaon Dabhade News: पुरातन यतिमशहा वली दर्गा दीड वर्षापासून ‘कुलूप बंद’

मुलांच्या भांडणानंतर दर्ग्याच्या सेवेकरी कुटुंबावर घर सोडण्याची पाळी

एमपीसी न्यूज – अनेक मुस्लिम तसेच हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेला तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक तळ्याजवळील यतिमशहा वली दर्गा दीड वर्षांहून अधिक काळ ‘कुलूप बंद’ अवस्थेत आहे. मुलांमधील भांडणानंतर गेली 90 वर्षे दर्ग्याची सेवा करणाऱ्या सेवेकरी कुटुंबावर तेथील घर सोडून बाहेर आश्रय घेण्याची पाळी आली आहे.

या संदर्भात संबंधित कुटुंबाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज केला आहे. दरम्यान, तळेगाव दाभाडे राजघराण्यातील याज्ञसेनीराजे दाभाडे व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले असून चर्चेतून सामोपचाराने हा विषय मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यास्मीन रहेमान बेग, असे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. गेली 90 वर्षे आमचे कुटुंब तळेगाव दाभाडे येथील यतिमशहा वली दर्गा येथील सेवेकरी मुजावर आहे. माझे सासरे मोहिद्दीन बेग यांच्यासह आम्ही दर्ग्याची मनोभावे सेवा करतो. संबंधित जागा ही आपल्या मालकीची असल्याचे सांगत जागेच्या मूळ मालकांनी आम्हाला बळजबरीने ताबडतोब घर सोडण्यास सांगितले, असे त्यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

आमच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह दर्ग्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या मदतीवर चालत असे. आमचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाल्यामुळे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या मिळेल ते काम करून आम्ही कसे-बसे दिवस काढत आहोत, असे बेग यांनी म्हटले आहे.

बेग कुटुंबाने माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याशी संपर्क साधला व न्याय मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व मदत करण्याची विनंती केली. त्यानंतर बेग यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळवून दिला ऩाही तर उपोषणाचा इशाराही अर्जात देण्यात आला आहे.

परस्पर सामंजस्यातून आठवडाभरात प्रश्न सोडविण्याची भूमिका 

किरकोळ कारणावरून एखाद्या कुटुंबाला घर सोडायला लावणे, हे अत्यंत अन्यायकारक आहे. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खूप जुना दर्गा बंद असल्याने त्याची दूरवस्था झाली असून त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. हा विषय चर्चेतून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे प्रदीप नाईक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

यासंदर्भात दाभाडे राजघराण्यातील याज्ञसेनीराजे दाभाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, मुलांमधील भांडणातून घडलेला हा प्रकार असून त्याबाबत दोन्ही कुटुंबांना समोरासमोर बोलवून चर्चेतून हा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने नांदावे, ही दाभाडे राजघराण्याची जुनी भूमिका व परंपरा आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात हा प्रश्न उभयपक्षांच्या सामंजस्याने सोडविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.