Talegaon Dabhade News: …आणि ‘लिटील हार्ट’ने घेतला मोकळा श्वास!

एमपीसी न्यूज – केवळ एका कोरोनाबाधित रुग्णामुळे जाहीर केलेला कंटेनमेंट झोन अखेर रद्द करण्यात आला आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील लिटिल हार्ट सोसायटीने मोकळा श्वास घेतला. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक यांनी नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

कोरोनाचा एक रुग्ण होम क्वारंटाईन असल्याने लिटील हार्ट सोसायटीतील नऊ नंबरच्या बिल्डिंग covid-19 प्रवेश बंदी केली होती. कुठलीही पूर्वकल्पना न देता तेथील नागरिकांची राहणारी बिल्डिंग सील करण्यात आलेली होती. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीही बाहेर पडता येत नसल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले होते. काही दिवसांपासून कुठल्याही प्रकारची साफसफाई नसल्याने सोसायटीत घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्यास आणखी धोका निर्माण झाला होता. त्या इमारतीतील रहिवाशांना कामावर जाण्यासही मनाई करण्यात आली होती.

या संदर्भात नाईक यांनी तळेगाव दाभाडे येथे नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड  तसेच उप मुख्याधिकारी सुप्रिया शिंदे  यांची भेट घेतली व  नागरिकांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी लवकरात लवकर तेथील रहिवाशांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचे तसेच व कंटेनमेंट झोनबाबत उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांच्याशी बोलून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी नाईक व लिटील हार्ट सोसायटीच्या शिष्टमंडळास दिले होते.

त्यानुसार प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सोसायटीत साफसफाईचे काम केले तसेच सोसायटीतील रहिवाशांवरील निर्बंधही शिथील केले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला. लिटील हार्ट सोसायटीमधील रहिवाशांनी नाईक यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.