Talegaon Dabhade News : कोरोनामुळे सतर्क राहून गणेशोत्सव साधेपणा साजरा करा – सहाय्यक आयुक्त

एमपीसी न्यूज – कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे यावर्षी देखील गणेशोत्सव साजरा करताना सतर्क राहून खबरदारी घ्यावी लागणार आहे. शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांनी उत्साहाबरोबरच साधेपणा देखील जपावा. कोरोनामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी केले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संजय नाईक पाटील बोलत होते.

या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक शहाजी पवार, आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे, तळेगावशहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा, नगरसेविका वैशाली दाभाडे, शोभा भेगडे, नगरसेवक अरुण माने, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, अग्निशमन विभागाचे पर्यवेक्षक पद्मनाभ कुल्लरवार, मयूर मिसाळ, रवींद्र काळोखे, प्रशांत वाबळे, अरुण गराडे, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, आशिष खांडगे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, महिला दक्षता समितीचे सदस्य व ग्रामसुरक्षा दलाचे दिलीप डोळस व सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नाईक पाटील पुढे म्हणाले “कोरोनाचे सावट अद्यापही कायम असून, त्याची खबरदारी घेऊनच मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. घरगुती मुर्ती दोन ते दीड फूट असावी. मिरवणूक काढायची नाही, मंडळाची गणेशमुर्ती 4 फूट असावी त्यापेक्षा मोठी नसावी, दि 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत परवानगी राहणार आहे. असेही सांगण्यात आले.

मूर्तीची उंची, मिरवणुकीबाबतचे धोरण, परवानगी याविषयी मंडळांनी कायद्याचे पालन करावे.” तसेच, नियमांचे काटेकोर पालन करून उत्सव साजरा केला जाईल, अशी ग्वाही पदाधिकारी व नगरसेवकांनी दिली.

शहरातील काही सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती चार फुटापेक्षा मोठ्या असून, विसर्जन केल्या जात नाहीत. याबाबत मंडळांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे यांनी व्यक्त केली.

घरगुती विसर्जनासाठी व्यवस्था केल्यास नगरपरिषदेतर्फे पाण्यात टाकण्यासाठी पावडर पुरविली जाईल, नियमांचे पालन करू, असे माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मंडळाचे पदाधिकारी मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, नगरसेवक अरुण माने, दत्ता भेगडे यांनी सांगितले.

सर्व परवाने घेऊन व नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक शहाजी पवार यांनी केले. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांचा बदली झाल्याने विविध मंडळांचे पदाधिकारी व दक्षता समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

वैशाली दाभाडे यांनी स्वागत केले. माने यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.