Talegaon Dabhade News: डॉ. आंबेडकर स्मारक नव्या पिढीसाठी उर्जास्रोत ठरेल – आमदार शेळके

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव येथील निवासस्थानाच्या पुनरुज्जीवनाच्या कामास प्रारंभ

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ऐतिहासिक वास्तूचे त्यांच्या स्मारकात रुपांतर होत आहे. हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी उर्जास्रोत ठरेल, असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आज (शुक्रवारी) व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या स्मृती जतन करणाऱ्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानाचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामास आज (शुक्रवारी) संविधान पूजनाने सुरूवात झाली. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका संगीता शेळके, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्ष ॲड. रंजना भोसले, उपाध्यक्ष एल.डी.कांबळे, सचिव किसन थुल, सहदेव डोंबे, दिनेश गवई, संजय गायकवाड, देवानंद बनसोडे, तुकाराम मोरे, आनंद वंजारी, रोहिणी ओव्हाळ, माधुरी थूल, गंगाधर सोनवणे आदी उपस्थित होते.

या पवित्र ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती, सुशोभीकरण, पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 1 कोटी 11 लाख 76 हजार रुपये निधी मिळाला आहे. आमदार शेळके यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या निवासस्थानाच्या विकासासाठी समितीने आजपर्यंत मोठे प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. या वास्तूचे प्रेरणादायी स्मारकात रुपांतर व्हावे, यासाठी येथे चांगल्या दर्जाचे संग्रहालय उभारण्यात यावे. हे निवासस्थान येणाऱ्या पिढीसाठी ऊर्जास्त्रोत ठरणार आहे. त्यादृष्टीने या वास्तूचे जतन केले गेले पाहिजे. या स्थळाला जगभरातून लोक भेट देण्यासाठी येतील आणि येथून न्याय, हक्कासाठी, समाजासाठी लढण्याची प्रेरणा घेऊन जातील. आणि बाबासाहेबांच्या स्मृती जोपासल्या जातील अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली.

समितीचे उपाध्यक्ष एल.डी.कांबळे यांनी प्रास्ताविक केले व संजय गायकवाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.