Talegaon Dabhade News : डॉ. डांगे यांच्या फसवणूक प्रकरणाचा फेरतपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज – एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने एका कंपनीच्या संचालकांनी तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला मात्र, तत्कालीन तपास अधिका-यांमुळे डॉ. डांगे यांना न्याय मिळाला नाही. याबाबतची तक्रार डॉ. डांगे यांनी न्यायालयाकडे केली असता डॉ. डांगे यांची तक्रार मंजूर करून घेत या फसवणूक प्रकारचा फेरतपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीच्या संचालकांनी सन 2014-15 साली तळेगाव येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची एक कोटी आठ लाख 78 हजार 660 रुपयांची फसवणूक केली. यात डॉ. डांगे यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाले. कंपनीच्या संचालकांनी डॉ. डांगे यांचे जगणे मुश्कील केले. याप्रकरणी डांगे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सन 2018 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांच्याकडे होता. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास न करता डॉ. डांगे यांची दिशाभूल करून गुन्ह्याची कागदपत्रे क समरी मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. ही क समरी डॉ. डांगे यांना मंजूर नाही. या गुन्ह्याचा पुन्हा तपास व्हावा, यासाठी डॉ. डांगे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले. डॉ. डांगे यांच्या फसवणुकीचा गुन्हा पुन्हा तपासावर घेण्यासाठी न्यायालयात पत्रव्यवहार करावा. गुन्ह्याची सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करावीत. डॉ. डांगे यांचा पुरवणी जबाब घेऊन या गुन्ह्याचा पुन्हा तपास करावा, असे आयुक्तांनी तळेगाव पोलिसांना सांगितले.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डी बी बाजगिरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला नाही. डॉ. डांगे यांची दिशाभूल करून या गुन्ह्याची कागदपत्रे क समरी मंजुरीसाठी न्यायालयात सादर केली. त्यामुळे तपास अधिकारी बाजगिरे यांचा याबाबत खुलासा घेऊन कसुरी अहवाल पोलीस आयुक्तांना सादर करण्याचे देखील आयुक्तांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना सांगितले आहे.

दरम्यान, डॉ. डांगे यांनी न्यायालयात धाव घेऊन आपली कैफियत मांडली असता न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करून घेत या फसवणूक प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश वडगाव मावळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभांगी कातकर यांनी दिला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.