Talegaon Dabhade News: इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयात ‘ई-परिषद’ संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे  येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयामध्ये नुकतीच ‘फार्मसी’ पदवीधारकांना शासकीय नोकरीच्या संधी’ या विषयावर ई. परिषद उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी दिली.

या परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामधे सांगितले कि, कोविड संक्रमण काळात सध्या पूर्ण महाविद्यालये बंद आहेत आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनामध्ये खंड पडू नये यासाठी घरूनच ऑनलाईन अध्यापन करत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम महाविद्यालय राबवत असते. परंतु सध्याच्या कोरोना काळात ते शक्य नसून या कोरोनाच्या संक्रमण काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचाच एक भाग म्हणून इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) आणि युनिक अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या ई-परिषदेचे आयोजन केले आहे. असे त्यांनी सांगितले.

तसेच फार्मसी पदवीधारकांना शासकीय व अंगभूत संस्थामध्ये उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीबद्दल जागृत करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण क्षेत्रात उतरावे व फार्मसी क्षेत्रातून देशाची सेवा करावी असे नमूद केले.

त्याचप्रमाणे महाविद्यालयात यापूर्वी विविध वेबिनार आयोजित केल्याची माहिती दिली. त्यामध्ये क्लिनिकल रिसर्च, उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर वेबिनार संपन्न झाल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले कि, फार्मसी क्षेत्रात फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल ट्रायल, डेटा मैनेजमेंट, मेडिकल कोडिंग, रायटिंग, औषधी गुणवता तपासणी व नियंत्रण या क्षेत्रात भरपूर नोकरीच्या संधी फार्मसी पदवीधारकांना उपलब्ध आहेत. या संधींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी वेबिनार चे आयोजन केले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना स्वतंत्र व्यवस्था महाविद्यालयात असल्याची माहिती हि त्यांनी दिली.

या परिषदेला युनिक अकेडमिचे प्रा. प्रवीण बूगे आणि प्रा. घुगे यांनी संबोधित केले. प्रा. प्रवीण बूगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बी फार्मसी पदवीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती दिली. या परीक्षा दिल्या नंतर आणि त्या परीक्षेमध्ये पात्र ठरल्यानंतर पदवीधारकांना थेट शासकीय सेवेची संधी मिळते. तसेच फक्त बी फार्मसी पदवीधारकांसाठीही विविध परीक्षांचे आयोजन या आयोगामार्फत केले जाते. त्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली. तसेच या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेची रचना व स्वरूप, या परीक्षेची तयारी कशी व केव्हा करावी या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली.

तसेच पदवी घेत असतानाच विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, प्रात्यक्षिकांना कसे महत्व द्यावे या बार्बीवरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रा. घुगे यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करताना विद्यार्थ्यांनी पदवी सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर यश मिळवण्यात अडचणी येत नाहीत आणि अभ्यासही चांगला होतो असे सांगितले.तसेच शासकीय सोबतच अशासकीय आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत असे नमूद केले आणि फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थी बेरोजगार राहूच शकत नाही असे नमूद केले. तसेच बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्राला पसंती द्यायला काहीच हरकत नाही असे आवाहनही केले.

या ई-परिषदेला दोनशेहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यांना इ प्रमाणपत्रही देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा आनंद खडके यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी बी. जैन यांनी मानले. या ई परिषदेला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मावळभूषण  कृष्णराव भेगडे , कार्यवाहक रामदास काकडे, कोषाध्यक्ष चंद्रकांत शेटे, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या व उद्योजिका निरुपा कानिटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.