Talegaon Dabhade News: अखेर मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बिलाअभावी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवणाऱ्या तळेगांव दाभाडे येथील मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणत याप्रकरणी कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉलेज प्रशासनावर कलम 297 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला.

गणेश शंकर लोके (वय-50) यांचा मायमर मेडिकल कॉलेजने उभारलेल्या कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बिलाचे पैसे दिले नसल्याने कॉलेजने नातेवाईकांना मृतदेह देण्यास नकार दिला होता. त्यावरून खासदार बारणे यांनी कॉलेजमध्ये जात प्रशासनाला खडेबोल सुनावले होते. संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी कोरोना आढावा बैठकीत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

याप्रकरणी गणेश यांचा मुलगा सुधीर गणेश लोके (वय-23, रा. मळवली, मावळ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मायमर काॅलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुधीर याचे वडिल गणेश लोके यांना कोरोनाचे निदान झाल्याने मायमर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गणेश लोके यांचा 1 मे रोजी मृत्यू झाला. फिर्यादी यांनी बिल न भरल्याने मायमर मेडिकल कॉलेज प्रशासनाने गणेश लोके यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता तीन दिवस ‘कोल्ड स्टोरेज’ मध्ये ठेवला होता. मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्यामुळे मायमर काॅलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मायमर मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचे उपचार सुरू असताना गणेश लोके यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बिलाचे पैसे दिले नसल्याने मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला होता. तीन दिवस मृतदेह ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवला होता. हे अतिशय धक्कादायक होते. मी स्वतः कॉलेजमध्ये गेल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला. पण, कॉलेज प्रशासनाने मृत रुग्णाच्या नातेवाईकांना पैशांसाठी प्रचंड त्रास दिला. त्यांची छळवणूक केली. उद्धटपणे वर्तन, दमदाटी केली. नातेवाईकांशी केलेला व्यवहार अतिशय चुकीचा होता.

याप्रकरणी आवाज उठविला. गुन्हा दाखल करण्याची मागणी कोरोनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यानुसार आज कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशासाठी चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबरच ज्या अधिकाऱ्यांनी मृत रुग्णाच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विलगीकरणात असलेल्या मुलाच्या घरी जाऊन जबाबावर सही घेतली. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.