Talegaon Dabhade News : विवाहितेवर बलात्कार व हत्येप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा द्या; राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोराडेश्वर डोंगरावर नेऊन विवाहितेवर बळजबरी बलात्कार करून तिचा ओढणीने गळा दाबून खून केला. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी. अशा घटनांमधील नराधमांना कोणतीही दयामया न दाखवता फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या वतीने तळेगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.

या प्रकरणी महिलेच्या चुलत दिराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप ठेवत चुलत दिराला पोलिसांनी अटक केली आहे. तुकाराम कोंडीबा धडस (वय24) असं अटक केलेल्या आरोपी चुलत दिराचे नाव आहे.

याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा भानुप्रिता पिद्दी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. यावेळी सुवर्णा जाधववर, सविता पाटील, पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर आदी उपस्थित होते. आरोपी तुकाराम धडस याच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बोलताना पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर म्हणाले, की आरोपींना कठोर व तातडीने शिक्षा झाल्याशिवाय महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होणार नाहीत. अशा घटनांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली जाते, मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास खूप मोठा वेळ जातो. त्यामुळे अशा आरोपींचे फावते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नराधम तरुणाने महिलेवर अत्याचार करीत तिला ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून मारून टाकले. क्रौर्याची परिसीमा गाठत या नराधम तरुणाने तिची ओळख लपविण्यासाठी तिचे डोके दगडाने ठेचले. अंगावर काटा आणणाऱ्या अशा घटनांमधील नराधमांना कोणतीही दयामया न दाखवता फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे, तसेच तिची अंमलबजावणी केली पाहिजे,  तरच अशा मोकाट नराधमांवर जरब बसेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.