Talegaon Dabhade News : आमदारांच्या आढावा बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते गैरहजर; आमदार सुनील शेळके म्हणाले…

एमपीसी न्यूज – तळेगाव नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून भाजपचे गटनेते अरुण भेगडे यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वतः भाजपचे गटनेतेच गैरहजर होते. यावर आमदार सुनिल शेळके यांनी आढावा बैठकीत ‘हे का लपून बसलेत हा मोठा प्रश्न आहे’, असे म्हणत नागरिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

आमदार सुनिल शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील विकास कामांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ‘सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि बैठक बोलावणारे गटनेते अरुण भेगडे आणि त्यांचे सर्व सदस्य पुन्हा लपून बसले. हे का लपून बसलेत हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताकरिता आपण एकत्र येणं गरजेचं आहे.’ असा टोला आमदार शेळके यांनी बैठकीत बोलताना मारला.

यावेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने नगरसेविका वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, मंगल भेगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, मुख्याधिकारी सतीश दिघे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, मावळ तालुका कोविड समन्वयक डॉ गुणेश बागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वैशाली भुजबळसह नगरपरिषदेती सर्व अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले, “अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी गटारी आणि पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर करावे. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेची इमारत नव्याने उभी करायची आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्या कामासाठी मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. नगरोत्थान, डीपीडीसीच्या माध्यमातून येत्या आठ दिवसात नगरपरिषदेने शहरातील महत्वाच्या कामांचे ठराव करून द्यावेत, ज्यामुळे नगरपरिषदेला 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता येईल.”

यावेळी आमदार शेळके यांनी नगरपरिषदेच्या चालु असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये भुयारी गटर, पाणी योजना, तळेगाव चाकण रस्ता रुंदीकरणात येणारे विजेचे खांब, रस्त्यावर बसणारे व्यावसायिक, नवीन नगरपरिषद इमारत, आंद्रा धरणातून तळेगावसाठी पाणी आणणे, तळेगाव स्टेशन भागात नवीन गॅसदाहिनी, डोळसनाथ महाराज सभामंडप व येत्या शुक्रवारी तळेगाव दाभाडे- शहराकरिता महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार. याबाबत सखोल चर्चा करून शासनाकडून मंजूर असलेल्या विकास कामांना निधी उपलब्ध करून नगरपरिषदेचा निधी त्यामध्ये समाविष्ट करून नगरपरिषदेची रखडलेली विकास कामे त्याचे कार्यपद्धतीचे ठराव येत्या आठ दिवसात सत्ताधारी पक्षासह सर्वानी करून द्यावेत, अशी मागणी व सुचना मुख्याधिकारी सतीश दिघे यांना केली.

पत्रकार परिषद घेऊन भाजप नगरसेवकांची वकिली करण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी हातात हात घालुन काम करण्याच्या आपल्या सदस्यांना सूचना करा, असा टोलाही आमदार शेळके यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांना लगावला.

यावेळी आमदार सुनिल शेळके यांची नवनियुक्त मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नियुक्तीनंतर पहिलीच आढावा बैठक असल्याने आमदार शेळके यांचे दिघे यांनी स्वागत करून सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.