Talegaon Dabhade News: नगर परिषदेच्या विकासकामांची आमदार शेळके बुधवारी करणार समक्ष पाहणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार सुनील शेळके येत्या बुधवारी (23 डिसेंबर) समक्ष पाहणी करणार असून त्यानंतर नगर परिषदेत आढावा बैठकही घेणार आहेत.

या संदर्भात आमदार शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना पत्र दिले आहे. शहरात सद्यस्थितीत अनेक कामे सुरु आहेत. ही विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी येत्या बुधवारी (23 डिसेंबर) सकाळी नऊ वाजल्यापासून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या समवेत कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करणार आहेत व त्यानंतर दुपारी तीन वाजता नगर परिषद कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये नगरपरिषदेकडून राज्यशासनास एकूण किती कामांचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. सदर प्रस्तावांपैकी वेगवेगळ्या विकासकामांसाठी एकूण किती प्रस्ताव मंजुर होऊन, प्रत्यक्ष किती निधी उपलब्ध झाला याची माहिती घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाणी योजना व भुयारी गटार योजना या कामांसाठी प्रत्यक्ष किती निधी उपलब्ध झालेला असून नगरपरिषदेकडून किती निधीची मागणी करण्यात आलेली होती. तसेच नगर प्रशासन विभागाकडून मंजूर झालेल्या नगरपरिषदेच्या इमारतीच्या निधीची सद्यस्थिती काय आहे, याचीही सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी दिल्या आहेत.

दौऱ्यात पणन मंडळ रस्ता, भाजी मंडई (सुभाष मार्केट), जिजामाता चौक ते घोरवडी स्टेशन रस्ता, टेलिफोन एक्स्चेंज जवळील रस्ता, हिंदमाता भुयारी मार्ग व जोडरस्ता, वतननगर येथील उद्यान, रेल्वे स्टेशनजवळील यशवंतनगर उद्यान, रेनो कॉलनी येथील विकासकामांची आमदार शेळके प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.