Talegaon Dabhade News: विद्युत विभागातील कामगारांना नगरपरिषदेने त्वरित पगार द्यावा : मिलिंद अच्युत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील विद्युत विभागातील हंगामी कर्मचाऱ्यांना त्वरित पगार देण्यात यावा, अशी मागणी जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी लेखी निवेदनाद्वारे उपमुख्यधिकारी सुप्रिया शिंदे यांच्याकडे केली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पगार मिळण्यासंदर्भात जनसेवा विकास समितीच्या संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना साकडे घातले. त्यानंतर जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी त्वरित नगर पालिकेत जाऊन वस्तुस्थिती जाणून घेतली.

नगरपरिषदेत विद्युत विभागातील कामाचा ठेका अबान इलेट्रीकलकडे असून भगवान भालेराव यांना हे काम देण्यात आले आहे. कामाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने भालेराव यांना लेखी पत्राद्वारे आगामी काळात काम सुरू ठेवण्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने सूचित केले आहे. भालेराव यांना नगरपरिषदेकडून बिलांची रक्कम प्राप्त न झाल्यामुळे वेतन देणे शक्य नसल्याचे भालेराव यांनी अच्युत यांना सांगितले.

नगरपरिषदेच्या विद्युत विभागात वेतानाबाबत अनागोंदी कारभार सुरू असून कागदोपत्री 20 हजार रुपये पगार असून वास्तवात संबंधित कर्मचाऱ्यांना 13 हजार रुपये पगार दिला जात आहे, तर मग सात हजार रुपये कुठे जातात, याचा खुलासा नगर परिषदेने करावा, अशी मागणी मिलिंद अच्युत यांनी केली.

विद्युत विभागातील कर्मचारी बांधव आर्थिक संकटात सापडले असल्याने त्यांना त्वरित पगार द्यावा व पगारातील तुटीबाबत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही अच्युत यांनी केली आहे.

तळेगावकर नागरिकांच्या कररुपी कष्टाच्या पैशांचा दुरुपयोग त्वरित थांबवण्यात यावा, विद्युत विभागाबरोबरच पाणी विभाग, अस्थापना विभाग, आरोग्य विभागातील कर्मचारी बांधवांच्या वेतनाबाबत व वेतन तुटीबाबत नगर परिषद प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी, असे अच्युत यांनी म्हटले आहे.

जनसेवा विकास समिती सदर कर्मचारी बांधवांच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन अच्युत यांनी विद्युत विभागातील कर्मचारी वर्गाला दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.