Talegaon Dabhade News: लेखक व व्याख्याते प्रा. दीपक बिचे यांचे निधन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मावळ शाखेचे कार्याध्यक्ष तसेच लेखक, व्याख्याते व सामाजिक कार्यकर्ते प्रा. दीपक नीळकंठ बिचे (वय 59) यांचे आज (शुक्रवार) दुपारी आकुर्डी येथील एका खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गावरील उपचार सुरू असताना निधन झाले. 

त्यांच्या मागे पत्नी, सात बंधू, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. उद्योजक प्रवीण बिचे व प्रकाश बिचे यांचे ते बंधू होत

प्रा. दीपक बिचे यांनी भारतीय जैन संघटना महाविद्यालयात प्रदीर्घ सेवा केली. नोकरी सांभाळून त्यांनी साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व सामाजिक अशा विविध क्षेत्रात योगदान दिले. विविध विषयावरील 10 पेक्षा अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. संत साहित्याचा त्यांचा अभ्यासही दांडगा होता. विविध सामाजिक संस्थांचे ते सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

महाराष्ट्रभर त्यांनी विविध विषयावरील शेकडो व्याख्याने दिली होते. उत्तम निवेदक व मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती.

श्रीरंग कला निकेतनचे ते माजी अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मावळ शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटवला. डोळसनाथ शिक्षण प्रसारक संस्था, वानप्रस्थाश्रम आदी विविध संस्थांच्या माध्यमातून ते कार्यरत होते.

प्रा. बिचे यांच्या अकाली निधनामुळे तळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

‘कोरोना’वरील पुस्तकाच्या लेखकाचे ‘कोरोना’मुळेच मृत्यू
कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करणारे पुस्तक प्रा. दीपक बिचे यांनी लिहिले होते. त्याचे 16 मार्चला ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले होते. ‘कोरोना’ या पुस्तक प्रकाशनानंतर अवघ्या 17 दिवसांनी पुस्तकाच्या लेखकाचा कोरोना संसर्गामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना या पुस्तकाबरोबरच फिटनेस फॉर हॅपीनेस तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अशा एकूण तीन पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. ही त्यांची शेवटची पुस्तके ठरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.