Talegaon Dabhade News: रा. स्व. संघाचे तालुका संघचालक यशवंत कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळ तालुका संघचालक यशवंत गेनुभाऊ कदम (वय 61) यांचे आज पहाटे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुगणालयात निधन झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तळेगाव शाखा मंत्री, प्रदेश सहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जनता सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले होते.

एक चळवळीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. चिंचवडच्या संघवी केसरी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांचे वडील गेनुभाऊ कदम तळेगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत कामाला होते. ते दलीत चळवळीतील व कामगार चळवळीतील कार्यकर्ते नेते होते. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. यशवंत कदम यांना चळवळीचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला.

अभाविपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत काम सुरू केले. औरंगाबाद येथे झालेल्या मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती राज्यस्तरीय परिषदेचे ते निमंत्रक होते. त्यांनी पुणे विद्यापीठाची अधिसभा निवडणूक विद्यापीठ विकास मंचद्वारा पदवीधर राखीव मतदार संघातून लढवली होती.

यशवंताचे पदवी शिक्षण पूर्ण होताच जनता सहकारी बँकेत नोकरी लागली. त्यांच्या घरी आर्थिक स्थैर्य आले. पुढे तळेगाव मधील शिक्षण संस्था व भाजप मध्ये पुढाकार घेऊन कार्य केले. मागासवर्गीय विद्यार्थी सहायतेसाठी त्यांनी अनेक उपक्रम चालवले.

पुण्याचे माजी महापौर भाऊसाहेब चव्हाण यांच्या कन्येशी त्याचा विवाह झाला होता. यशवंत कदम यांचे घर संघ परिवारातील कार्यकर्त्यांसाठी कायम आधारस्तंभ होते.

जातीय समाजकारणाच्या वर जाऊन समरसतेचे समाजकारण करणारा एक दीर्घकाळचा सहकारी , मित्र, कार्यकर्ता आज अचानक अनंतात विलीन झाला. हे दुःख सहन करणे त्याच्या कुटुंबाला तसेच सहकाऱ्यानां अवघड आहे . परंतु त्याने विद्यार्थी परिषद कार्यातून घेतलेले सामाजिक कार्याचे संस्कार व त्या नुसार जगलेले जीवन सर्वासाठी प्रेरणादायी राहील, या शब्दांत अभाविपचे ज्येष्ठ पदाधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी यशवंत कदम यांना श्रद्धांजली वाहिली.

तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत मोजक्या उपस्थितीत यशवंत कदम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.