Talegaon Dabhade News : पत्रकारितेचा अंकुश समाजाच्या विकासाला गती देतो – दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज – शासन आणि प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी पत्रकारितेचा अंकुश महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे समाजाच्या विकासाला गती मिळते, असे मत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले.

तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात झिंजाड बोलत होते. यावेळी तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सुनील वाळूंज, बी.एम. भसे, तात्यासाहेब धांडे, मच्छिंद्र बारवकर, प्रभाकर तुमकर, श्रीकांत चेपे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे उपस्थित होते.

दीपक झिंजाड म्हणाले, “शासन, प्रशासनाच्या चुका दाखविण्यासह त्यांचे कौतुक करण्याचे देखील पत्रकार काम करतात. समाजहिताची पत्रकारिता करताना अनेक पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रकारितेचा अंकुश असल्याने शासन आणि प्रशासनाच्या कामात गती येते.

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केलेल्या निर्भीड व नितीमुल्य जपणाऱ्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा आजच्या काळातही जपणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सचिव अतुल पवार यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. सोनाबा गोपाळे गुरूजी यांनी जांभेकरांच्या कार्याचा आढावा घेत आभार मानले.

मेधाविन फाउंडेशनच्या वतीने पत्रकरांचा सन्मान
मेधाविन फाउंडेशनच्या वतीने तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार, सुनील वाळुंज, बी एम भसे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सोनबा गोपाळे गुरूजी, तात्यासाहेब धांडे, प्रभाकर तुमकर, मच्छिंद्र बारावकर श्रीकांत चेपे आदींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा व मेधाविन फाऊंडेशनच्या संस्थापिका वैशाली दाभाडे, ज्योती शिंदे, स्वाती विक्रम दाभाडे, जयश्री पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार हे आपल्या लेखणीमधून समाजामध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन करून समाज घडविण्याचे काम करतात, असे प्रतिपादन वैशाली दाभाडे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.