Talegaon Dabhade News: विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक अस्लम शेख यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक संस्थेचे निवृत्त मुख्याध्यापक अस्लम शेख (वय 72) सर यांचे बुधवारी (ता.5) येथे निधन झाले.  

संस्थेच्या पवना विद्या मंदिर, नवीन समर्थ विद्यालय, एकवीरा विद्या मंदिर येथे 34 वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. शेख सर आणि त्यांच्या पत्नी सलिमा शेख यांनी ग्रामीण भागातील ‌व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी व गणिता सारखे अवघड विषय सोपे करून शिकवले.

90 च्या दशकात शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थी एसएससी परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले, त्यामध्ये शेख सरांचे महत्वपूर्ण ‌योगदान आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी आमदार, नगरसेवक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांचा‌ मावळ पंचक्रोशीत लौकिक आहे. पर्यावरण,गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे इ. ठिकाणी जाऊन अभ्यास करणे हा त्यांचा आवडता छंद होता, विशेष बाब म्हणजे त्यांनी सायकल आणि स्कूटर वरून संपूर्ण भारत भ्रमण केले आहे. फोटोग्राफी हा देखील त्यांचा आवडता छंद होता.

शासन व विविध सामाजिक संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापक  ‌पुरस्काराने गौरविले होते. अध्यापन क्षेत्रातील ते उत्तम मार्गदर्शक होते. त्यांचे पुत्र अमजद शेख व सूनबाई समिना शेख हे त्यांचा ज्ञानदानाचा भक्कम वसा आणि वारसा पुढे चालवत‌ आहेत.

उद्योजक अश्रफ‌ शेख व प्रा. अमजद शेख यांचे ते‌ वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.