Talegaon Dabhade News : शेलारवाडीत घरगुती देखाव्यांमधून सामाजिक संदेश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे गणेशोत्सवानिमित्त घरगुती देखाव्यांमधून सामाजिक संदेश दिला जात आहे. एका घरात विठुरायाच्या चरणी ‘कोरोनाचे संकट जाऊ दे आणि वारी पुन्हा सुरू होऊ दे’ असे साकडे घातले आहे. तर एका घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी देखाव्यातून प्रबोधन करण्यात आले आहे.

शेलारवाडी ता.मावळ येथे गौरी – गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणपतीनंतर गौरीच्याही आगमनाने बालगोपाळांसह महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गणेश चतुर्थी, गौरी आवाहन, गौरी पुजन या सणांमुळे घरगुती वातावरणात प्रसन्नता आलेली आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.परंतु घरगुती गणेशोत्सवात मात्र सामाजिक देखावे केल्याचे दिसून आलेले आहे.

दरवर्षी नाविण्यपूर्ण देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या योगिता राजू भेगडे यांनी यावर्षी पंढरपूर येथील विठूरायाचे भव्य दिव्य मंदिर साकारले असून पुढील वर्षी कोरोनाचा नायनाट होऊन पुन्हा पंढरीची वारी सुरु होऊ दे, असे साकडे गणरायाकडे घातलेले आहे.

पूजा सतिश भेगडे यांनी यावर्षी ‘बैलगाडा शर्यती व शेतकरी आत्महत्या’ यांविषयी सामाजिक बांधिलकी जोपासणारा विषय आपल्या देखाव्यातून व्यक्त केलेला आहे. कितीही संकटे आली तरीही बळीराजाने आत्महत्येचा पर्याय स्विकारु नये,असे प्रबोधन करणारा हा देखावा सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे..

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.