Talegaon Dabhade News: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये महात्मा फुले विमा योजना सुरु करा-आयुष प्रसाद

रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला महात्मा फुले विमा योजनेतून सुविधा प्राप्त होणार की नाही हे स्पष्ट करावे किंवा होणार असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती द्यावी.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी महात्मा फुले विमा योजना सुरू करावी. त्यासाठी त्वरित ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात मावळ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आयुष प्रसाद बोलत होते.

यावेळी प्रसाद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी सूचना केल्या. यामध्ये तालुक्यातील कोरोना रुग्णासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा मोफत करावी, सर्व रुग्णालयांमध्ये आकारण्यात येणाऱ्या बिलाच्या संदर्भात शासकीय अधिकार्‍यांची नेमणूक करावी, अशी सूचना केली.

तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला महात्मा फुले विमा योजनेतून सुविधा प्राप्त होणार की नाही हे स्पष्ट करावे किंवा होणार असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती द्यावी. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील गॅस शवदाहिनीवर मृताचे दहन करताना मोफत करावे.

यासाठी सभेमध्ये ठराव मंजूर करून घ्यावा. मावळ तालुक्यामध्ये लोणावळ्यापासून देहूरोडपर्यंत तसेच ग्रामीण भागातील कोविड-19 रुग्णांसाठी मोफत अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करावी. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब असलेले नागरिक व व्यसनाधीन असलेल्या नागरिकांना घरीच आयसोलेशनमध्ये ठेवावे.

जर त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर शासनाने घालून दिलेले सर्व नियम ते पाळतात की नाही त्याची पाहणी करावी. तसेच मायमर मेडिकल कॉलेज येथे 720 बेड उपलब्ध आहेत. परंतु कोविड-19 कक्षासाठी अल्प प्रमाणात या कॉलेजमध्ये बेड दिलेले आहेत. ते वाढून घेण्याची सूचना तहसीलदार व तालुका आरोग्य प्रमुखांना देण्यात आली.

यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले कोविड-19 रुग्णासाठी ॲम्बुलन्सची व्यवस्था मोफत असावी. रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर केलेल्या उपचारांचे बिल हे जास्त नसावे रुग्णालयाच्या बाहेर उपचारासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता लावा. आदी सूचना शेळके यांनी यावेळी केल्या.

कोरोना रुग्णवाढीबाबत घ्यावयाची काळजी व होत असलेली दिरंगाई याबद्दल उपस्थित अधिकारी यांना आमदार सुनील शेळके व कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चर्चा करून कार्यवाही करण्यास सांगितले.

याप्रसंगी मावळ मुळशीचे प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसुदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवी पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी वाजे, मायमरच्या विश्वस्त सुचित्रा नांगरे, डॉ. स्वाधीन ढाकणे, डॉ. संदीप कुमार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.