Talegaon Dabhade News: स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा आठवा क्रमांक

आरोग्य समिती सभापती सुलोचना आवारे यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत 2020 च्या सर्वेक्षणात तळेगावदाभाडे शहराचा आठवा क्रमांक आला आहे. गतवर्षी शहर 56 व्या क्रमांकावर होते. त्यामध्ये यंदा मोठी सुधारणा झाली आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य समिती सभापती सुलोचना आवारे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे शहराच्या क्रमांकावरुन दिसून येत आहे.

नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे  साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा हेतू ठेवून सर्वेक्षण केले जाते.  25 हजार पर्यंत लोकसंख्येची शहरे, 25 हजार ते 50 हजार, 50 ते 1 लाख लोकसंख्या, 1 लाख ते 3 लाख, 3 लाखाच्या पुढे 10 लाख लोकसंख्या असलेली शहरे अशा विभागण्या सर्वेक्षणासाठी केल्या आहेत. त्यामध्ये 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या या विभागात तळेगावदाभाडे शहराचा समावेश होता. जानेवारीत हे सर्वेक्षण झाले होते.

पश्चिम विभागातील स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड असे पाच राज्य होते. त्यात कराड शहर पहिले लोणावळा शहर दुस-या क्रमांकावर आले आहे. तर, तळेगावदाभाडे शहराचा आठवा क्रमांक आला आहे.  गेल्यावर्षी शहराचा 56 वा क्रमांक होता. यावर्षी त्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. आरोग्य समिती सभापती सुलोचना आवारे यांनी शहर स्वच्छतेसाठी चांगले काम केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे शहराच्या क्रमांकावरुन दिसून येत आहे.

याबाबत बोलताना नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी (सीओ) दिपक झिंजाड म्हणाले, ”स्वच्छ भारत 2020 सर्वेक्षणात पश्चिम विभागात शहराचा आठवा क्रमांक आला आहे. नागरिकांचा प्रतिसाद, कर्मचा-यांचे कष्ट, पदाधिका-यांनी केलेले सहकार्य. शहरातील शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था प्रत्येकांनी यासाठी योगदान दिले आहे. यामुळे सर्वेक्षणात शहराचा स्थर उंचावण्यात मोठी मदत झाली”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.