Talegaon Dabhade News : कोविडच्या प्रमाणपत्रावर लस शोधणार्‍या शास्त्रज्ञाचा फोटो हवा – माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

एमपीसी न्यूज – कोविडच्या आजारामुळे सध्या मानवी जीवन दुःखी आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी लस शोधली त्यांचा सन्मान होण्याऐवजी एखाद्या भलत्याच व्यक्तीचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर येत असेल तर यासारखी धोक्याची बाब नाही. वास्तविक पाहता माणसांना जगवण्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांचे योगदान डावलून कोणी आपले फोटो छापत असतील तर ही शरमेची बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

इंद्रायणी महाविद्यालाच्या वतीने चंडीगड येथील राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्ण व रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. कोतापल्ले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे होते.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विकास समिती सदस्य परेश पारेख, फार्मसीचे प्राचार्य बी. बी. जैन, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, वेटलिफ्टिंगचे गुरु बिहारीलाल दुबे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश थरकुडे, प्रा. के. व्ही. अडसूळ, संस्थेतील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

चंडीगड येथील राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणारे चेतना घोजगे, चिराग वाघवले यांचा तर रौप्यपदक विजेत्या हर्षदा गरुड, रुचिका ढोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह व प्रत्येकी पाच हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना डॉ. कोतापल्ले पुढे म्हणाले की, आज देशामध्ये सर्व क्षेत्रात गोरगरिबांची मुस्कटदाबी होत आहे. शिक्षणावर होणारा खर्च अत्यल्प आहे. स्त्रियांची कुचंबणा होत आहे. आज आपण कुठे चाललो आहोत. ज्ञानाच्या शाखा व स्त्रोत वाढत आहे. आणि हे सर्व होत असताना नव्या पिढीसाठी अद्ययावत प्रयोगशाळा, तसेच अद्ययावत अभ्यासक्रम आले पाहिजे. खरं म्हणजे आज ज्ञानाचा जगभर विस्फोट होत आहे आपण कल्पना करू शकत नाही. हे संशोधक, तसेच खेळाडूंना योग्य प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.

महाराष्ट्र हा प्रांत योध्यांचा, शौर्य गाजवीणारांचा, मावळयांचा आहे. खेळाडूंना प्रोत्साहन द्या. ते निश्चितच धेय्य प्राप्त करून नावलौकिक करतील असा विश्वास माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोथापल्ले यांनी व्यक्त केला.

मी स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी एकाच विद्यापीठांमध्ये 9 नोबेल पुरस्कार विजेते होते. मग असे विद्यापीठ, असा देश का पुढे जाणार नाही. आपल्या देशामध्ये गुणवंतांचा सन्मान होत नाही. मुलांना चांगले चॉईस उपलब्ध करून दिले जात नाही. आपल्याकडे सरकार खेळाडूंसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देत नाही. पूर्वीच्या काळात शाहू महाराजांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे हिंदकेसरी निर्माण झाले. आज आमचे लोक खेळाडूंचा फक्त सत्कार करायला पुढे पुढे जातात. पण तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. हा चिंतेचा विषय आहे. खऱ्या अर्थाने ज्यांनी शोध लावले, ज्यांनी देशासाठी सुवर्णपदक पटकावले, अशांना सलाम करण्याऐवजी आम्ही आमचाच प्रचार करतो. आमचेच महत्त्व सांगतो, आणि ही बाब देशासाठी निश्चितच मागे ओढणारी आहे .देशाला जर पुढे जायचं असेल तर खेळाडूंचा, शास्त्रज्ञांचा आणि ज्यांचे ज्यांचे देश हितासाठी योगदान आहे त्यांचे महत्त्व व त्यांचे फोटो छापायला शिकले पाहिजे अशी भावना याप्रसंगी कुलगुरू यांनी व्यक्त केली .

तसेच याआधी देखील गोवर, पोलिओ, स्वाइन फ्लू यांसारखे अनेक साथीचे आजार येऊन गेले, त्यावर देखील मोफत लसीकरण झाले परंतु तेथे कुठेही कोणाचे फोटो छापण्याचे ऐकिवात नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशासाठी प्रशिक्षक म्हणून प्रा. बिहारीलाल दुबे यांचे देखील योगदान बहुमूल्य आहे. त्यांनी आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. संस्थेचे महाविद्यालय विकासह समिती सदस्य परेश पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.के. व्ही. अडसूळ यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश थरकुडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी सांगितले की,आम्ही संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून अद्ययावत जिम, इंडोअर गेम हॉल तसेच 400 मीटर धावण्यासाठी धावपट्टी तयार करणार असल्याचे सांगितले. तसेच खेळाडूंसाठी सोयी सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध होणार आहे. पाच मजली भव्य इमारत याठिकाणी उभी राहणार आहे. यापूर्वी शिवछत्रपती पुरस्कार संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. अशाच प्रकारचे योगदान पुढे राहील , असा आम्हाला विश्वास असल्याचेही शेटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.