Talegaon Dabhade News: जमिनीच्या वादातून सुनेला जिवे मारण्याची धमकी, चुलत सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित जमिनीवरून असलेल्या वादातून चुलत सासऱ्याने फोनवरून अर्वाच्य शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सुनेच्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मधुरा कुशल पुरकर (रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. भालचंद्र विनायक पुरकर (रा. कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरकर परिवाराची अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीवरून पुरकर परिवारात वाद आहे. फिर्यादी मधुरा पुरकर यांनी दोन सप्टेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे चुलत सासरे असलेल्या भालचंद्र पुरकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी व्यक्ती मालमत्ता बळकविण्याचा प्रयत्न करीत आहे. मालमत्तेचे गोपनीय कागदपत्र बळाचा वापर करून लवपत आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर व्यवहार करीत आहे. जमिनीच्या हव्यासापोटी मूळ मालक व स्वतःच्या आईला वाऱ्यावर टाकून स्वतःच्या सुनेला जिवे मारण्याची धमकी देत आहे, असे फिर्यादी मधुरा पुरकर यांनी जबाबात म्हटले आहे.

या प्रकरणी मधुरा पुरकर यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक व भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी अस्मिता सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मधुरा पुरकर सहकार्य करीत पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी नेले.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.