Talegaon Dabhade News: तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘बीओटी’ तत्वावर; वार्षिक आराखड्याला मान्यता

 शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

एमपीसी न्यूज  – मावळ लोकसभा मतदारसंघातील  तळेगाव-चाकण-शिक्रापूर  हा राष्ट्रीय महामार्ग  ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ (बीओटी) या तत्वावर  विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या वार्षिक विकास आराखड्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. या महामार्गाच्या कामासाठी 1 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

तळेगाव-चाकण-शिक्रापुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खासदार बारणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. तसेच  स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून महामार्गाच्या कामाला गती देण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी महामार्गाचे काम बीओटी तत्तावर करण्यास मान्यता दिली आहे. त्यानिमित्त खासदार बारणे यांनी आज (गुरुवारी) गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”चाकण, तळेगाव परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कारखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक असते. यात मालवाहतूक वाहनांचे प्रमाण जास्त  आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर पूर्वी राज्य मार्ग होता. त्याला राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याबाबत 16 मार्च 2016 रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले. त्याला राजमार्ग 548 -डी म्हणून घोषित केले”.

”राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने त्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला. परंतु, भूसंपादनाची कारवाई, त्यासाठी लागणारा निधी पाहता त्याला विलंब होणार होता. तसेच हे काम होणेही शक्य नव्हते. त्यामुळे महामार्ग ‘बीओटी’ तत्वावर  विकसित करण्याचा डीपीआर तयार करण्यात आला. वार्षिक आराखड्याला केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आहे त्या जागेवरच या महामार्गाचे काम करण्यात येणार आहे”.

”अतीगर्दी होणा-या तळेगाव दाभाडेमध्ये दोन किलोमीटर ‘ओव्हर ब्रीज’ बांधला जाणार आहे. तर, चाकण म्हाळुंगे एमआयडीसी चौकात अंडर पास करण्यात येणार आहे. या संपूर्ण रस्त्याचे काम बीओटी तत्तावर दिले जाणार असून 1 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे. या रस्त्यावर टोल उभा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले असल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.