Talegaon Dabhade : जेएनयू मधील हिंसाचार ; विद्यार्थी स्तरावर राजकारण होणे निषेधार्ह

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- सध्या चाललेल्या विविध विद्यापीठातील हिंसक घटनांबद्दल सर्व प्रथम निषेध. खर तर विद्यार्थ्यांच्या स्तरावर असे प्रकार, असे राजकारण होणे निव्वळ निषेधार्ह आहे. समाजाच्या पुढच्या सुसंस्कृत पिढ्यांवर हे असे संस्कार होणे अत्यंत वाईट आहे. यातून उद्या काय वाढून ठेवले जाईल, याची कल्पना नको करायला. पण ! तरीही अशी एक आशा निश्चित आहे की, ही सजग तरुण पिढी या बाबतीत विचार करेल आणि योग्य पाउले उचलेल. समाजात डावे उजवे न करता , योग्य काय आहे हे निश्चित बघेल.

यासाठी काही उपाय मनापासून सुचवावेसे वाटतात .

१ कॉलेज च्या पातळीवरील निवडणुकांवर फेरविचार व्हावा

२ राजकीय पक्ष आणि संघटना यांना तिथे शिरकाव करायला मज्जाव करण्यात यावा

३ निवडणुका घ्यायच्याच असतील तर मिश्र गट पाडून मगच निवडणुका घ्यायला हव्यात …

विद्यार्थी नीट तावून सुलाखून, योग्य अभ्यास करूनच पुढे यावेत .तरुणांनी राजकारणात यावे पण योग्य अभ्यास नसेल, लोकशाहीची सूत्रेच माहीत नसतील तर काहीही उपयोग नाही. असे अर्धवट ज्ञानाचे लोकप्रतिनिधी समाजाच्या काहीच उपयोगात येणार नाहीत. हिंसाचार करून कुठल्या सरकारला विरोध करता येतो काय ? विरोध करण्याचे इतर मार्गही असतात की. लोकशाही मार्गानेही न्याय मिळतो हे मागच्या पिढ्यांनी दाखवून देण्याची गरज आहे.

नेहमी हातात दगडच घ्यायला हवा असे नसते. क्रांतीची मशाल नेहमीच पेट्रोलने पेटली पाहिजे असेही नाही … कधी कधी एक साधी चिंगारी एखाद्याची चूल पेटवून त्याची भूक भागवू शकते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया विद्यापीठ यांनी आता वेगळ्या कारणांनी आदर्श जगात निर्माण करण्याची गरज आहे .एफ .टी आय आय ने आता सृजनशील कलावंताना अधिक अधिक व्यासपीठ देण्याची गरज आहे. अन तिथेही डावे उजवे राजकारण याला थारा देऊ नये अस मनापासून वाटत इतकच ……

HB_POST_END_FTR-A2
You might also like