Talegaon: अवजड वाहनांना बंदीच्या पहिल्याच दिवशी कातवी रोडवर उलटला दगडांचा डंपर

एमपीसी न्यूज – अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी केल्याच्या पहिल्याच दिवशी कातवीहून तळेगाव स्टेशनच्या दिशेने निघालेला मोठ्या दगडांनी (डबर) भरलेला डंपर आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास यशवंतनगरच्या तीव्र चढावर जात असताना उलटला. डंपरवरील नियंत्रण सुटल्याचे लक्षात येताच चालकाने केबिनमधून बाहेर उडी मारल्याने तो बचावला. तसेच पाठीमागून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला.

दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने आजपासूनच (मंगळवार) छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कातवी फाट्याकडे जाणा-या मार्गावरील अवजड वहातूक प्रायोगिक तत्त्वावर बंद केली आहे. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. वाहतूक शाखेने याबाबत लेखी स्वरुपात दि 17 ते 31 मार्च या कालावधीत सूचना व हरकती मागवल्या आहेत. या हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे वहातूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी जाहीर केले होते.  अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील बंदीच्या पहिल्याच दिवशी आदेशाचे उल्लंघन झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बांधकामाचे दगड म्हणजेच डबर वाहतूक करणारा डंपर (MH 14, CP 9099) कातवीहून तळेगाव स्टेशनच्या दिशेने निघालेला डबराने भरलेला डंपर आज दुपारी साडेचारच्या सुमारास यशवंतनगरच्या तीव्र चढ चढत असताना अचानक उलटला. डंपरवरील नियंत्रण सुटल्याचे लक्षात येताच चालक हरिनारायण चौरे (वय 28, रा. टाकवे, मावळ) याने चालत्या वाहनाच्या केबिनमधून बाहेर उडी मारल्याने तो बचावला. तसेच पाठीमागून कोणतेही वाहन चढावर नसल्याने मोठा अपघात घडला नाही. चालक चौरे याच्या हाताला किरकोळ जखम झाली असून प्रथमोपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी असतानाही त्या रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक सर्रास सुरू असल्याचे दृश्य आज पहिल्या दिवशी पहायला मिळाले. या अपघातामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याच्या आवश्यकतेवर शिक्कामोर्तब झाले आहे, असे परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या दोन्ही टोकांना लोखंडी कठडे उभे करून अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे मोठे फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.