BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शिवाजी दाभाडे यांना दहीहोडच्या लढाईत वीरमरण आल्याचे इनामपत्रातून स्पष्ट

छत्रपती राजारामांचे इनामपत्र झाले उपलब्ध

एमपीसी न्यूज- छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीहून स्वराज्यात आणताना वाटचालीत दमछाक होऊन, काळीज फुटल्याने रक्‍ताच्या उलट्या होऊन शिवाजी दाभाडे यांचा मृत्यू झाला असा तर्कवितर्कावरचा इतिहास आजपावेतो रूढ होता. मात्र छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांना वऱ्हाड प्रांती दिलेल्या मोडी लिपीतील मूळ नकलप्रत नुकतीच हाती लागली असून त्यामध्ये तळेगावच्या सरदार दाभाडे घराण्यातील वीरपुरुष शिवाजी दाभाडे यांचा मृत्यू दहीहोडच्या लढाईत सैन्यासह लढताना झाला असल्याचा उल्लेख आढळून आला आहे. या पत्राची मूळ नकलप्रत खंडेराव दाभाडे यांचे 13 वे वंशज सत्यशीलराजे दाभाडे यांच्या हाती लागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजीराव दाभाडे यांना थोरला खंडेराव, धाकटा शिवाजी ही दोन मुले होती. रायगडाला झुल्फिकार खानने टाकलेल्या वेढ्यादरम्यान स्वराज्यसेवक खंडेराव आणि शिवाजी दाभाडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना घेऊन वाघ दरवाजातून निसटून जिंजीला सुरक्षित पोच केले. जवळपास सात वर्षांनी पुन्हा राजाराम यांना घेऊन जिंजीहून स्वराज्यात सुरक्षित परतले. त्यानंतरच्या काळात खानदेशातील वऱ्हाड प्रांतातील दहोहोडच्या लढाईत सैन्यासोबत लढताना शिवाजी दाभाडे यांचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख या इनामपत्रात आढळून आला आहे. त्यामुळे शिवाजी दाभाडे यांना स्वराज्यासाठी लढताना वीरमरण आल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘शिवाजी दाभाडे वऱ्हाड प्रांतातील दहीहोड भागात सेनासमुदाय घेऊन गेले असता, युद्धप्रसंगी जखमा होऊन मरण पावले. या कारणी वंशपरंपरेने दहीहोडचा हा भाग खंडेरावास इनाम म्हणून देण्यात येत आहे,’ असा उल्लेख या पत्रात असल्याचे मोडी लिपीचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी सांगितले. हे इनामपत्र सुहूरसन 1100 मध्ये लिहिले असून, वरच्या भागावर इंग्रजी सही असल्या अर्थाने सदर पत्र ब्रिटिशकाळात प्रमाणित असल्याचे लवाटे यांनी नमूद केले.

शिवाजीरावांचे शौर्य आणि पराक्रम सदा दुर्लक्षित राहिले, अशी खंत सत्यशीलराजे दाभाडे यांनी व्यक्‍त केली. मात्र, शिवाजी दाभाडे यांची स्वराज्यनिष्ठता आणि बलिदान या पत्रामुळे जगासमोर आल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्‍त केले. या पत्राच्या आधारे इतिहास दुरुस्तीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात 1951 मधोल सेनापती दाभाडे दफ्तरात केलेल्या यापूर्वीच्या मागणीचाही आधार घेणार असल्याचे सत्यशीलराजे यांनी सांगितले.

.